आधुनिक तंत्राद्वारे रंगीबेरंगी कलिंगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:24 PM2020-02-08T23:24:19+5:302020-02-08T23:24:23+5:30
वाड्यातील देवघरमधील प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत अत्याधुनिक शेती करू लागले आहेत. हे शेतकरी आपल्या शेतामध्ये फळे, फुले, भाजीपाला अशी उत्पादने घेऊ लागले आहेत. असाच एक अनोखा प्रयोग देवघर येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने केला आहे. आपल्या पाच एकर जागेत रंगीबेरंगी कलिंगड व दहा गुंठा जागेत पॉली हाऊस करून सिमला (ढोबळी) मिरचीची लागवड केली असून त्यात त्यांना यश आले आहे. यासाठी या शेतकºयाने ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्राचा वापर केला आहे.
यासाठी पाटील यांनी शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत केली व त्यात सºया ओढून त्यावर मल्चिंग टाकले. त्यानंतर त्यात बी-बियाणे लावून संपूर्ण शेतीत ठिंबक सिंचन केले. त्यांनी आपल्या शेतात दोन जातीच्या कलिंगडची लागवड केली आहे. बी लागवडीपासून ९० दिवसांत हे पीक तयार झाले आहे. मल्चिंग आणि ठिंबक पद्धतीने ही शेती केल्याने मनुष्यबळ अगदी कमी झाले. एक-दोन माणसं हे सर्व करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कलिंगडावर कोणत्याही रोगाचा प्रभाव पडू नये यासाठी त्यांनी फळमाशी पकडण्यासाठी साफळे लावले असून, त्या सापळ्यात माशी आपोआप अडकते. यासोबतच त्यांनी शेतामध्ये चिकट पॅट लावला आहे. त्याला चिकटलेली माशी पाहता पिकावर कोणती कीटकनाशक फवारणी करायची हे लक्षात येते व पिकावरील रोगाचे प्रमाण शून्य होऊन चांगले उत्पादन मिळते, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी औषधे व खतेही ठिबक सिंचनातून दिली आहेत. पूर्वी गोणीमध्ये खत द्यावे लागायचे, मात्र आता वेंच्युरीमधून खते दिली जात असल्याने खताचे प्रमाणही कमी लागत आहे. तसेच कमी पाण्यात पीक घेता येत असल्याचे ते म्हणाले. तसेच ते रंगीबेरंगी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहेत. या ढोबल्या मिरच्या लाल, पिवळी व हिरवी अशा तीन रंगात आहेत. रिझवान या वानाची मिरचीची १० गुंठे जागेत ४ हजार झाडे लावली आहेत. ढोबळी मिरची इन्सेट नेटमध्ये लागवड केली आहे.
सध्या ते पिवळ्या व हिरव्या अशा दोन रंगात कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ते उत्पादन घेत असलेल्या पिवळ्या कलिंगडात आतील गर लाल आहे. तर हिरव्या कलिंगडातील आतील गर पिवळा आहे. या शिवाय ही कलिंगडे चौकोणी, लव्ह आकाराची तयार केली आहेत. त्यांच्या शेतातील एक कलिंगड तीन ते चार किलो वजनाचे असून १८ ते २० किलोचा भाव आहे.