वाड्यात रंगली क्रीडा स्पर्धा; कबड्डी लीग स्पर्धेत जय हनुमान संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:38 PM2020-01-11T22:38:05+5:302020-01-11T22:38:31+5:30
ध्रुव वॉरियर्स संघ उपविजेता तर सेव्हन स्टार लायन संघाला तृतीय पारितोषिक
कुडूस : तालुक्यातील दिनकरपाडा येथे अष्टविनायक ग्रुपच्या वतीने हरेश चौधरी क्रीडा नगरीमध्ये ७ ते १० जानेवारी या दरम्यान चार दिवस पार पडलेल्या कबड्डी लीग स्पर्धेमध्ये जय हनुमान संघ अंतिम विजयी ठरला असून ध्रुव वॉरियर्स उपविजेता तर सेवन स्टार लायन या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले आहे.
या स्पर्धेला कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, भिवंडीचे आमदार महेश चौगुले, कबड्डी असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक देवराम (नाना) भोईर, शशिकांत ठाकूर, देवा ग्रुपचे तानाजी मोरे, माजी पं.स. सदस्या अंकिता दुबेले, स्वाभिमान संघटनेचे जितेश पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, तौसीब भुरे आदी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत विभागातील ९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आठ संघ मालकांनी लिलाव पद्धतीने हे खेळाडू विकत घेतले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद विशे, सुरेश विशे, दीपक मोकाशी, उत्तम चौधरी, रवींद्र दळवी, कल्पेश पाटील, रवींद्र बागुल, श्रीधर विशे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रो-कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा
अष्टविनायक ग्रुप दिनकरपाडा यांच्या वतीने प्रो-कबड्डीच्या धर्तीवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या स्पर्धा गालीच्या (मॅट) वर होत असल्याने खेळाडूंमध्ये कमालीची उत्सुकता पाहावयास मिळाली. महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील अस्सल मैदानी खेळ म्हणजे कबड्डी होय. या खेळामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यवसायिक खेळाडू म्हणून संधी मिळवून देणे व चालना देणे या हेतूने प्रेरित होऊन आयोजित करण्यात आल्या होत्या.