परिवहनचा संप सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:10 AM2017-08-16T02:10:53+5:302017-08-16T02:10:56+5:30
कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले
वसई : कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसºया दिवशी प्रशासन अथवा ठेकेदाराने दुर्लक्ष केले. तसेच दहा कामगारांना बडतर्फ केल्याने कामगार संतापले असून आंदोलन चिघळण्याची भिती आहे.
किमान वेतन, वीमा संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेतील सर्व कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. संध्याकाळपर्यंत महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराने कामगारांशी कोणतीच बोलणी केली नाहीत. त्यामुळे बेमुदत संप करण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी केला. त्यामुळे सोमवारपासून परिवहन सेवेचे कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत.
प्रशासन आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळेच बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागत असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कामगारांना किमान वीस हजार रुपये वेतन मिळायला हवे. त्यांना विमा संरक्षण द्यायला हवे. यासह कामगारांच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे पंडित यांनी सांगितले. पण, संपाच्या दुसºया दिवशीही प्रशासन अथवा ठेकेदाराने संपकरी कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, संपावर तोडगा काढण्याऐवजी ठेकेदाराने प्रवीण देवरुखकर, राजू मुलानी, महेश पवार, सुनील चव्हाण, वैभव शिगवण, नवनाथ आहिरे, दत्तूू राजपंखे, संकेत सावंत, प्रदीप चालके आणि आबासो कोळेकर यांना मंगळवारी नोटीस बजावून परिवहन सेवेतून बडतर्फ केले. त्यामुळे कामगारांध्ये संतापाची लाट पसरली आहे. कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असेही संघटनेच्यावतीने प्रशासनाला बजावण्यात आले आहे.
>प्रवाशांचे हाल एसटीकडून दिलासा
परिवहन सेवेच्या संपाचा फटका वसईकरांना बसू लागला आहे. दोन दिवसांपासून बसेस रस्त्यावर धावत नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. एसटी महामंडळाने सध्या अ़र्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपोतून काही मार्गावर बसेस सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, परिवहन संपाचा फायदा उचलत रिक्शाचालकांनी काही भागात प्रवाशांची अडवणूक करीत लुटमार सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे.