वसई-विरारसह सर्व प्रवासीवर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:09 AM2021-01-06T00:09:00+5:302021-01-06T00:09:13+5:30

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन सेवेचे लोकार्पण :  कोरोनाकाळापासून वसईत बंद होती बससेवा

Committed to provide excellent service to all travelers including Vasai-Virar! | वसई-विरारसह सर्व प्रवासीवर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध!

वसई-विरारसह सर्व प्रवासीवर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार महापालिका हद्दीतील प्रवाशांसह इतरही प्रवासीवर्गास उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याकरिता पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच बुमसेवा देणारी कदाचित वसई-विरार महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचे सांगत खऱ्या अर्थी आजच्या दिवशी महापालिकेच्या वतीने अधिकृतपणे लोकार्पण झाले आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत केले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशात विकासकामांची उद्घाटने करतो, तर विरोधक हे रात्रीच्या अंधारात उद्घाटन करतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी बविआला लगावला. एवढेच नाही तर ही परिवहन सेवा नागरिकांसाठी आहे, यात आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण आणत नाही. खरे तर यामध्ये सर्वांनी सहभागी होणे गरजेचे होते, मात्र ठीक आहे. बुम पद्धतीने सुरू झालेल्या या परिवहन सेवेचा आर्थिक भार पालिकेवर अजिबात राहणार नाही, तर यानंतरही अजून १५० बसेस येतील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आदींना सवलत आहेच, मात्र महापालिका व त्याच्या परिवहन विभागातर्फे यापुढेही नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नगरविकास मंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर अखेर शहरात बसेस धावू लागल्या. या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, पालिका आयुक्त गंगाथरन डी., शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, आमदार श्रीनिवास वनगा, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अविनाश जाधव यांना वसई न्यायालयाच्या आवारातच रोखले : पोलिसांना मिळाली होती गुप्त खबर
n वसई-विरार महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा साजरा होताना दोघा मनसैनिकांनी कार्यक्रमस्थळी गुपचूप प्रवेश मिळवत, अचानकपणे आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली आणि या सोहळ्याला गालबोट लागले, तर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी वसई न्यायालयाच्या आवारातच रोखून धरले होते.
n परिवहनसेवेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी 
मनसेकडून गोंधळ घालण्यात येईल, याची गुप्त माहिती पोलिसांना आधीच मिळाल्यानंतर सर्वत्र वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, तरीही  दोन मनसेचे कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून कार्यक्रमात गेले व व्हायला नको तो प्रकार घडला. त्यावेळी प्रसंगावधान राखत शिवसैनिक व तुळींजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्या दोघांची धरपकड करत त्यांना तुळींज पोलीस ठाण्यात नेले.
n जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, आयुक्त गंगाथरन आम्हाला वेळ देत नाहीत. आठ महिने झाले, वसईत १५ लाख चौरस मीटर भागावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही वेळ मागत आहोत आणि इतका पोलीस बंदोबस्त करूनही मनसेच्या आंदोलनाचा धसका घेत, मला वसईचे डीसीपी व एसीपी यांनी वसई कोर्ट परिसरातच कार्यक्रम संपेपर्यंत उभे ठेवले. तरीही आमचे दोन वाघ आत शिरून राडा केला. त्यांच्या कर्तृत्वावर गर्व आहे, असे सांगून पोलिसांनी आमच्या 
मनसैनिकांना घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहिली आहे, त्यांचाही लवकरच समाचार घेऊ. 

Web Title: Committed to provide excellent service to all travelers including Vasai-Virar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.