‘तिच्या’ उपचाराचा भार कंपनीने उचलला, नातेवाईक समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:36 AM2017-11-30T06:36:36+5:302017-11-30T06:36:49+5:30
पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे.
नंडोरे : पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे. तसेच त्यांना संपुर्ण वैद्यकिय सुविधांसह आर्थिक लाभ मिळणार आहेत. विशेष म्हणजे कंपनी प्रशासन दोघा पती-पत्नीला या पुढे रोजंदारीवर न ठेवता कामावर कायम करणार आहे.
लोकमतने २५ नोव्हेंबर रोजी ‘मशीनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी’ या मथळ्याखाली चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये भावना पाटील यांचा झालेला अपघाताचे वृत्त प्रसिद्ध केले होते. २२ नोव्हेंबर रोजी चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत संध्याकाळच्या सुमारास काम करतांना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत गेल्याने तिचे तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली होती.
या बाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कंपनी प्रशासनाने त्यास प्रतिसाद देत भावना यांना कंपनी संपूर्ण औषधोपचाराचा खर्च त्याचबरोबरीने तिचे पती व तिला कंपनीमार्फत कायमस्वरूपी नोकरी तसेच ती बरी होईपर्यंतचा तिचा सर्व खर्च उचलत असल्याचे कंपनी प्रशासनानते लोकमतशी बोलताना म्हटले आहे. भावना यांच्या बोटावर सोमवारी पालघर येथे त्या दाखल असलेल्या खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्या आता स्थिर आहेत. मंगळवारी त्यांना दवाखान्यातून रजा देण्यात आली असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. लोकमतच्या वृताची दखल कंपनी प्रशासनाने घेतल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी लोकमतचे आभार मानले आहे.