हप्तेखोर वाहतूक पोलिसाची तक्रार
By admin | Published: April 12, 2017 03:56 AM2017-04-12T03:56:09+5:302017-04-12T03:56:09+5:30
एका वाहतूक पोलिसांनी मागितलेल्या हप्त्याचा प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर वसईत पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे
वसई : एका वाहतूक पोलिसांनी मागितलेल्या हप्त्याचा प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर वसईत पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी लोकमतचे भरभरून कौतुक केले. तर माजी आमदारांनी थेट गृहमंत्र्यांकडेच तक्रार करून भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी केली आहे.
वाहतूक पोलीस नारायणे चौगुले यांनी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी वामन शेळके यांच्याकडे मागितलेल्या हप्त्याचे संभाषण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर आज दिवसभर वसई विरार परिसरात वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचीच चर्चा होती. माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस यांनी लोकमतच्या बातमीचे कात्रण जोडून गृहमंत्री आणि पालघर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केलीआहे. हप्ता मागणाऱ्या पोलीस हवालदारावर कारवाई करण्यात यावी आणि भ्रष्टाचार दूर करावा अशी मागणी घोन्सालवीस यांनी केली आहे.
नालासोपारा शहरात सर्वाधिक बोगस रिक्शा आणि बेकायदा मॅजिक रिक्शा धावतात. याप्रकरणी एका रिक्शा युनियनने तक्रार केली होती. त्यावेळी वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेकायदा वाहतूक करणाऱ्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्याशी सदर रिक्शा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मला दरमहा ७५ हजार रुपये द्या आणि बाकीचे तुम्ही वाटून घ्या, असा सल्ला दिल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर रिक्शा युनियनच्या पदाधिकाऱ्याने दिली. एकंदरीत लोकमतच्या बातमीने वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी दूर व्हावी आणि रिक्शाचालकांची दादागिरी, मनमानी मोडीत निघावी इतकीच माफक अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)