मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:54 PM2018-07-29T16:54:23+5:302018-07-29T16:55:22+5:30

शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे.

Complaint filed by BJP corporators for water issue in Mira road | मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

Next

मीरारोड - शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. त्यामुळे शहरात पुरेसं पाणी असल्याचा सत्ताधारी भाजपाच्या दाव्याला गळती लागली आहे. 

शिवसेना नगरसेवकांनी शहरातील पाणी टंचाई व सूर्या योजनेचे पाणी लवकर आणा, म्हणून महापौर डिंपल मेहता यांना रिकामी घागर भेट दिली होती. भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर, नवघर भागातील महिलांनी देखील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना घेराव घातला होता . व पाणी खूपच कमी मिळत असल्या बद्दल संताप व्यक्त केला होता. काँग्रेसनेदेखील पाणी टंचाई मुळे नागरिक त्रासले असल्याच्या तक्रारी चालवल्या आहे . 

परंतु मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना पाणी पुरेसं असून पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा भाजपाच्या प्रमुख मंडळींकडून सतत केला जात होता. महापौर डिंपल मेहता यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पाणी टंचाई व सेनेच्या आंदोलना बद्दल विचारणा केली असता त्यावेळी शहरात पाणी पुरेसं येत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास नसल्याचे सांगण्यात आले होते . स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी तर पत्रकारांनाच, तुमच्याकडे आहे पाणी येतं की नाही सांगा ? असा सवाल केला होता .   

परंतु महापौर मेहता सह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या प्रभागातील हाटकेश , कनकिया ,   मंगल नगर , गौरव सिटी , रामदेव पार्क आदी भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत.  नगरसेवक संजय थेराडे , अनिता मुखर्जी व रुपाली मोदी यांनी तर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याची तक्रार वाकोडे यांना भेटून लेखी स्वरूपात केली आहे . उपमहापौर वैती यांच्या दालनातच वाकोडेंना बोलावून पाणी टंचाई वर चर्चादेखील करण्यात आली .  

२४ तासांनी येणारे पाणी आता नागरिकांना ३६ तासाने मिळत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले . या भागातील नागरिकांच्या प्रामुख्याने पाणी टंचाईच्या तक्रारी असल्याचे मांडण्यात आले .  वाकोडे यांनी पाणी टंचाई चे कारण सांगताना नदी पात्रातून पाणी उचलणारे पंप कचरा अडकून बंद पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले . येत्या काही दिवसात पाणी पुन्हा सुरळीत होईल असे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले . 

Web Title: Complaint filed by BJP corporators for water issue in Mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी