पालघर जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी तणावाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:43 AM2020-01-25T00:43:45+5:302020-01-25T00:45:57+5:30
नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद
पालघर/पारोळ : देशाची ढासळती आर्थिक स्थिती तसेच नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद लाभत असताना पालघर शहारामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून बंदच्या कार्यात अडथळे आणले. यामुळे जिल्ह्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. बंद दरम्यान अडथळे आणणाऱ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील पालघर, वसई तालुक्यातील शहरी भाग वगळता अन्य सहा तालुक्यांत बंदचा विशेष प्रभाव जाणवला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीने राज्यभर बंदची घोषणा केल्यानंतर पालघर शहरात बंद पाळण्यात येणार असल्याने शहरातील विविध व्यापारी संघटनांनी आपली दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवीत आम्ही बंदला समर्थन देणार नसल्याने आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळण्याची लेखी मागणी पालघर पोलीस ठाण्यात केली होती. त्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी सकाळी वंचितच्या वतीने शहरातील दुकाने बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याने सकाळी २ ते ३ तास शहरातील दुकाने, रिक्षा बंद होत्या.
याच दरम्यान नागरिकत्व कायद्याचे समर्थक असलेल्या भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढून जय श्रीरामच्या घोषणा देत बंद असलेली दुकाने उघडण्याचे आवाहन केल्याचे दिसून आले. या वेळी जय मोदीच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते की काय असा प्रसंग निर्माण झाला होता. मात्र पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कुठलेही गालबोट न लागता ११-१२ नंतर शहरातील सर्व दुकाने उघडली गेली. वसई तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय गट एकत्र येऊन आंदोलनात उतरले होते, त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी सामाजिक व धार्मिक संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सामील झाले होते. व्यापारी वर्गानी बंदला चांगला प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रसंगी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.
जय श्रीरामच्या घोषणा
जिल्ह्यात शांततेने बंद करण्यात यावा यासाठी वंचितच्या वतीने पोलिसांसह विविध संघटनांच्या युनियन, शिक्षण समिती यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु पालघर जिल्हा व तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून हातात तिरंगा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. तसेच दुकानदारांना ‘डरने की कोई बात नही’ असे आवाहन केले.