गणेशमूर्ती विसर्जनानंतर खतनिर्मिती; ‘ग्रीन गणेश’ संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:47 AM2020-08-10T00:47:54+5:302020-08-10T00:47:57+5:30
विरारमधील मूर्तिकाराची नवीन कल्पकता
पारोळ : यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. हा उत्सव साजरा करताना त्याचा फायदा निसर्ग वा कृषीला व्हावा, यासाठी एका मूर्तिकाराने या मूर्तीच्या विसर्जनातून खत तयार होणारी मातीची मूर्ती बनवली असून गणेशमूर्ती घडवताना त्याने नवीन कल्पनेची जोड दिली आहे.
निसर्गरक्षणाचा दिवस साजरा करीत असताना माणसाच्या प्रत्येक कृतीतून निसर्गालाच देवत्व बहाल करून पर्यावरणाचा समतोल कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण विरार येथील एक कलावंत परेश घाणेकर यांनी आपल्या गणेशमूर्तीच्या अभिनव कल्पनेतून घालून दिले आहे. अलीकडे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींना प्रचंड मागणी असताना शाडूच्या आणि लाल मातीच्या मूर्ती अनेक अडचणींवर मात करून मूर्तिकार घडवीत आहेत. लाल माती ही पर्यावरणपूरक असून तिच्यामध्ये बी रुजवून मूर्तीच्या विलयानंतर उरलेल्या मातीचा वापर कल्पकतेने झाडांना खत म्हणून करण्याची कला या मूर्तीतून साधण्यात आली आहे.
यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवाला मर्यादा आल्या असून मूर्तीचे आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणुकांवर बंदी आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविणे पुरेसे नाही, तर ही मूर्ती कृषी पर्यावरणाला कशी पूरक ठरेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन ‘ग्रीन गणेश’ संकल्पनेतून बनविलेल्या मूर्तीत विविध झाडांच्या बिया मिसळण्यात आल्या आहेत. ही मूर्ती गणेशोत्सवानंतर घरच्या घरी मोठ्या टबमध्ये विसर्जित केल्यावर मूर्तीची माती विरघळते व तिचे खतात रुपांतर होते. हे खत कृषी लागवडीसाठी वापरण्यात येते, असे मूर्तिकार परेश घाणेकर यांनी सांगितले.