पालघर, डहाणू, बोईसरच्या नागरिकांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:39 AM2020-04-29T02:39:23+5:302020-04-29T02:39:35+5:30

याआधी पालघरमध्ये ११ तर डहाणूमध्ये आठ रुग्ण आढळले होते. रविवारी बोईसरमध्ये एक रुग्ण वाढला होता.

Concerns of the citizens of Palghar, Dahanu and Boisar increased | पालघर, डहाणू, बोईसरच्या नागरिकांची चिंता वाढली

पालघर, डहाणू, बोईसरच्या नागरिकांची चिंता वाढली

Next

पालघर/बोईसर : मंगळवारी एकाच दिवसात पालघर आणि बोईसरमध्ये चार रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यामुळे आता पालघर, डहाणू आणि बोईसर परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर गेली आहे. जिल्ह्यातील वसई-विरार या शहरी भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील अन्य भागांत बाधितांच्या संख्येत फारशी वाढ झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात होते. याआधी पालघरमध्ये ११ तर डहाणूमध्ये आठ रुग्ण आढळले होते. रविवारी बोईसरमध्ये एक रुग्ण वाढला होता.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पालघर नगरपरिषदेसह अन्य ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी आपला भाग कडकडीत बंद करून स्वत:ला २ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ करून घेतले आहे. रविवारी रात्री बोईसरच्या दलाल टॉवर येथील ३४ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे कळल्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे येथे हलविले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य १० लोकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी त्या रुग्णाच्या तीन नातेवाइकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याच्या पत्नीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे. त्या तीन नातेवाइकांना बोईसरच्या टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे पालघरमधून मुंबई येथील रुग्णालयात सेवा देणारी एक ५७ वर्षीय परिचारिका पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सातपाटी येथील एका ४५ वर्षीय संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेने कळवले आहे.
पालघर जिल्ह्यात वसई-विरारसह एकूण १५० कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली असून, पालघर तालुक्यात १५ कोरोनाबाधित (१ मृत्यू), डहाणू तालुक्यात ८ बाधित, वसई तालुक्यात सर्वाधिक १२७ बाधित तर ९ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचे संकट शहरी भागावरच आधी घोंघावत होते.
आता पालघर जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातही कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केल्याने पालघर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींनी सोमवारपासून आपल्या भागात ‘लॉकडाउन’ घोषित केले होते. यानंतर आता दांडी, पास्थळ आदी ग्रामपंचायतींनीसुद्धा कोरोनाचा शिरकाव आपल्या भागात होऊ नये म्हणून आपला भाग ‘लॉकडाउन’ करून घेतला.
दरम्यान, बोईसरमधील दलाल टॉवरसह कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामधे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याविषयीची माहिती, वय व मोबाइल नंबर घेतला जात आहे.
>२ मेपर्यंत संपूर्ण पालघर शहर होणार लॉकडाउन
मुंबईतील एका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या पालघरच्या एका ५७ वर्षीय परिचारिकेला कोरोनाने विळखा घातल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्य दिसून येत नसल्याने २९ एप्रिल ते २ मेपर्यंत संपूर्ण पालघर शहर लॉकडाउन घोषित करण्यात येत असल्याचे पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी घोषित केले आहे.
>कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणेला सहकार्य करावे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून घरातच राहून काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन करावे.
- डॉ. अभिजीत खंदारे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर

Web Title: Concerns of the citizens of Palghar, Dahanu and Boisar increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.