शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:27 AM2019-12-08T01:27:35+5:302019-12-08T01:27:55+5:30
प्रवाशांना दिलास; अनेक महिन्यांपासून खड्ड्यांतून करावा लागत होता प्रवास
पालघर : राजकीय हेवेदावे, कुणाच्या मतांची बेगमी तर कुठे एसटी महामंडळाची नकारघंटा आदी समस्यांनी घेरलेल्या शिवाजी चौक ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला अखेर ११ डिसेंबरचा मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून खड्ड्यातून प्रवासाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
शिवाजी चौक पालघर ते हुतात्मा स्तंभ या दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली होती. या कामापैकी हुतात्मा स्तंभ ते हनुमान मंदिर या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र हनुमान मंदिर ते पुढे शिवाजी चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण अनेक कारणांनी अडले होते.
सद्यस्थितीत ५ मीटर असलेल्या या रस्त्याची रुंदी वाढवून ती ७ मीटर्स करण्यात येणार आहे. या रस्त्याची खोदाई करून नव्याने काँक्रिटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार होता. परंतु या रस्त्याच्या खाली असलेल्या नगरपरिषदेच्या नळाच्या पाण्याच्या जलवाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते. तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारे बाजूला सरकवणे आवश्यक होते.
मात्र नगरपरिषदेने आपली जीर्ण झालेली जलवाहिनी स्थलांतरित करण्याऐवजी नव्याने जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. तर गटार बाजूला सरकविण्याच्या कामासाठी हा रस्ता दोन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र त्याला राज्य परिवहन महामंडळ (एसटी) विभागाने आडकाठी आणली होती. यानंतर काही राजकीय लोकांनी रस्त्यावरील काही खाजगी लोकांच्या मालमत्तेचा प्रश्न उपस्थित केल्याने काम रखडले होते.
पालघर-मनोर-बोईसर असा वाहतुकीचा मोठा भार असलेल्या या रस्त्यावरील वाहतूक अन्य पर्यायी रस्त्यावरून वळविणे अशक्य असल्याचे पालघर पोलिसांनी कळविल्यानंतर सदर काँक्रिटीकरण रस्ता बनविताना एकेरी वाहतूक सुरू ठेवूनच बनविण्यात यावा, असा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून ११ डिसेंबरपासून काँक्रिटीकरणाला सुरुवात होणार आहे.
नवीन रस्ता हा ७ मीटर्स लांबीचा बनविणे अपेक्षित असले तरी भूसंपादन करण्याची कुठलीही तरतूद या कामात नसल्याने जेवढी जागा उपलब्ध असेल तेवढ्या जागेवर काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे अभियंते महेंद्र किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पालघर-मनोर-बोईसर हा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने हा रस्ता ७ मीटरऐवजी ९ मीटरचा बनवावा असा प्रस्ताव आम्ही काही नागरिकांनी बांधकाम विभागाला दिला होता. त्यासाठी आमच्या भागातील जागा मिळवून देण्यास आम्ही तयार होतो.
- बाबा कदम, माजी नगरसेवक.