मुंबई-पालघर मच्छिमारांत संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:19 PM2018-10-16T23:19:04+5:302018-10-16T23:19:19+5:30
मढच्या मच्छिमारांनी गुजरातपर्यंतच्या समुद्रात ठोकली कव : स्थानिक मच्छिमार संतप्त
पालघर : वसई, उत्तनसह मुंबईतील मढ भागातील कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी पालघर, डहाणू ते थेट गुजरात-दमणच्या समुद्रातील मासेमारी क्षेत्रात हजारो कवी (खुंटे) मारून अतिक्रमण केल्याने स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण बनले आहे. अनेक वर्षांपासूनच्या या प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्याने पालघर व गुजरात जिल्ह्यातील मच्छिमारांनी समुद्रात लढा उभारणारण्याचा निर्णय घेतला आहे.
समुद्रातही वसई-उत्तन विरुद्ध पालघर-डहाणू हा हद्दीचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून खदखदत असून अनेक चर्चा, निवेदने, मंत्र्यांच्या भेटी घेऊनही तो निकाली काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा वाद धुमसत रहात असून समुद्रात हाणामारीच्या घटना घडत आहेत.
या वादा संदर्भात २० जानेवारी १९८३ साली २८ मच्छीमार गावातील नेमलेल्या समितीची बैठक तत्कालीन आमदार मारुतीराव मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. प्रत्येक भागातील मच्छीमारांनी आपल्या गावा समोरील समुद्रात मासेमारी करावी असा ठराव मंजूर झाला होता. त्या अनुषंगाने तशी अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र वंशपरंपरागत पद्धतीने ठरवून दिलेल्या मासेमारी नियमांना डावलून वसई भागातील मच्छीमारांनी अन्य भागात अतिक्र मणे करायला सुरुवात केली. त्यामुळे समुद्रात संघर्ष घडू लागल्याने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी इकबाल सिंग चहल यांच्या दालनात १८ आॅक्टोबर १९९३ रोजी सर्व मच्छिमार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी मच्छिमारांनी आपल्या गावासमोरच कवी मारण्याचे आदेश दिले होते. पुन्हा सन २००४ मध्येही सातपाटीच्या पश्चिमेस ४२ नॉटिकलपर्यंत मारण्यात आलेल्या कवी काढण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते.
समुद्रात कोणी कुठे जाळी मारावी याबाबत कायदे, नसल्याचा फायदा उचलीत वसईतील फिलिप मस्तान व इतरांनी उच्चन्यायालायत याचिका दाखल करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळवली. त्याचा फायदा घेत वसई, अर्नाळा, उत्तन, मढ, गौराई आदी भागातील बोटींनी (बल्ल्याव) प्रत्येकी १८ ते २० कवी अशा २५ ते ३० हजार कवी मारल्या आहेत.
समुद्रात किनाऱयापासून ५० ते ६० नॉटिकल क्षेत्रा पर्यंतच मासेमारी केली जात असून या क्षेत्रात ओएनजीसी चे शेकडो प्लॅटफॉर्म असून त्याच्या चोहोबाजूने ८ ते १० किलोमीटर्सचा भाग हा प्रतिबंधित आहे. चुकून यात मच्छिमार बोटींनी प्रवेश केल्यास सुरक्षा रक्षकांकडून फायरिंग केली जाते. (अशा घटनेत एका मच्छिमाराचा गोळी लागून मृत्यूही झाला होता) या भागातील तीस सहकारी संस्थेची बैठक सातपाटी येथे रविवारी पार पडली. त्या आपापल्या गावासमोरील समुद्रात जाऊन इतर भागातील मच्छीमाराना रोखणार आहेत. त्यामुळे समुद्रात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आम्ही मच्छिमारी करायची तरी कुठे?
युपीए सरकारच्या काळात शरद पवार कृषिमंत्री असताना यूपी चे राज्यपाल राम नाईक ह्यांनी त्यांना पत्र लिहून समुद्रातील ईईझेड क्षेत्रात वसई विरुद्ध पालघर-डहाणू संघर्षाबाबत पत्र लिहून तात्काळ कायदे बनविण्याची मागणी केली होती.
मात्र त्यात युपीए सरकारला अपयश आले आता केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना आणि राम नाईकांच्या कानी अनेक वेळा हा मुद्दा घातला असताना त्यांना कायदे बनविण्यास का बरे अपयश येते? असा प्रश्न आहे.
ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म तर दुसरीकडे उत्तन, वसई, मढ येथील मच्छीमारांच्या हजारो कवीनी मोठे क्षेत्र गिळंकृत केल्यामुळे मासेमारी साठी क्षेत्रच उरत नसल्याने मासे पकडण्यासाठी आमची जाळी मारायची कुठे? असा प्रश्न आहे.
समुद्रात चारही बाजूने कवींची खुंटे रोवल्याने एका वेळेस ८० पैकी २० जाळीही समुद्रात टाकता येत नसल्याने मासेच मिळत नसल्याने ट्रिप फुकट जात नुकसान सोसावे लागते.
-विश्वास पाटील, क्रि याशील मच्छिमार