जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:55 PM2021-05-03T23:55:07+5:302021-05-03T23:55:27+5:30

जव्हारमध्ये दिवसभरातील लसीकरण बंद : बाहेरील व स्थानिकांचा गोंधळ शिगेला

Confusion at vaccination centers in the district | जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर गोंधळ

जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर गोंधळ

Next

जव्हार : जव्हारच्या कुटीर रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी बाहेरील व स्थानिकांच्या लसीकरणावरून गोंधळ उडाला. गोंधळ इतका वाढला की, रुग्णालय यंत्रणेला पोलिसांना बोलवावे लागले.

१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, दोन दिवस सुटी असल्याने नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरण करता आले नाही. परंतु ३ मे रोजी सोमवारी जव्हार येथील कुटीर रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवशी जव्हारच्या लसीकरण केंद्रावर बाहेरील जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांनी याच ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करून गोंधळ उडवून दिला. त्यानंतर जव्हार भागातील नागरिक संतप्त झाल्याने लसीकरण केंद्र बंद केले.

जव्हारच्या लसीकरण केंद्रात रविवार दि. २ मे रोजी १३०० लसींचा डोस पुरविण्यात आला आहे. सेल्फ ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे कोणीही कुठलेही केंद्र निवडू शकतो, असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवार सकाळपासून सेल्फ ऑनलाईन नोंदणी करणारे मुलुंड, अंधेरी, ठाणे, वसई, विरार आदी भागातून जवळपास १५० लोक लसीकरण करण्यासाठी थेट जव्हारला आले होते. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांत वाद निर्माण झाला. यावेळी स्थानिक पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष शिंदे यांनासुद्धा बोलविण्यात आले होते.
वाद वाढून काही वेळातच भांडणाचे स्वरूप निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी तातडीने गोंधळ शमविला. यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व शिष्टमंडळ यांची वैद्यकीय अधीक्षक डॉ. मराड यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. जिल्हाधिकारी यांनी एका दिवसासाठीचे लसीकरण बंद करण्याचे आदेश दिले.

१) ऑनलाइन लसीकरण नोंदणी करताना, केंद्र निवडताना तालुक्याची किंवा जवळपासच्या अंतराची मर्यादा घालण्यात यावी, जेणेकरून स्थानिक लोकांना वेळेवर लस उपलब्ध होण्यास मदत होईल.
- दिनेश भट, माजी नगराध्यक्ष, जव्हार

शासनाच्या धोरणानुसार ज्यांची नोंदणी करण्यात आली आहे अशा व्यक्तीला लस द्यावी लागते. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारचे लसीकरण बंद करण्याचे आदेश आल्यामुळे केंद्र बंद करण्यात आले आहे.
- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, 
कुटीर रुग्णालय, जव्हार

Web Title: Confusion at vaccination centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.