अदानी कंपनीच्या तोडफोडी प्रकरणी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 01:28 PM2018-12-16T13:28:38+5:302018-12-16T13:34:17+5:30
वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीवरुन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदरच्या अदानी इलेक्ट्रीसीटी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोनलावेळी झालेल्या तोडफोडी प्रकरणी अदानी कंपनीच्या फिर्यादी वरुन २० ते २५ अज्ञातांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मीरारोड - वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीवरुन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदरच्या अदानी इलेक्ट्रीसीटी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोनलावेळी झालेल्या तोडफोडी प्रकरणी अदानी कंपनीच्या फिर्यादी वरुन २० ते २५ अज्ञातांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ही तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणीची ठरली आहे.
अदानी इलेक्ट्रीसीटीने पाठवलेली वीज देयके भरमसाठ दरवाढीची असल्याने त्या विरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या अधिकारयांना भेटुन निवेदन दिले होते. परंतु निवेदन देऊन देखील कार्यवाही न झाल्याने शनिवार १५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर फाटक येथील कंपनी कार्यालया बाहेर काँग्रेसने निदर्शने करुन दरवाढ कमी करण्याच्या घोषणा दिल्या होत्या.
(अदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल)
हुसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कंपनीच्या अधिकारयांना भेटण्यासाठी जाणार असताना २० ते २५ जणांनी कंपनीचे प्रवेशद्वार , फलक, रखवालदाराची चौकी आदिंची तोडफोड केली होती. पंखे, दुरध्वनी यंत्र, फलक, झाड्याच्या कुंड्या आदींच्या तोडफोडीने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद कंपनीचे विशेष अधिकारी प्रकाश सावंत यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिली. सावंत यांच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी २० ते २५ अनोळखी लोकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक विजय टक्के पुढिल तपास करत आहेत. दरवाढ कमी न केल्यास वीज देयक न भरता लोकं असहकार आंदोलन सुरू करतील, असा इशारा हुसेन यांनी दिला होता.