डहाणू प्रांत कार्यालयावर काँग्रेसचा प्रचंड मोर्चा
By Admin | Published: October 14, 2016 06:11 AM2016-10-14T06:11:00+5:302016-10-14T06:11:00+5:30
पालघर जिल्ह्यात कुपोषणाने होणारे बालमृत्यू रोखण्यास तसेच काँंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकऱ्यांकडून होणारी मारहाण रोखण्यास त्याच
डहाणू : पालघर जिल्ह्यात कुपोषणाने होणारे बालमृत्यू रोखण्यास तसेच काँंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकऱ्यांकडून होणारी मारहाण रोखण्यास त्याच प्रमाणे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना आर्थिक मदत देण्यास सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीने डहाणू प्रांत कार्यालयावर आज माजी. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला होता.
मोर्चाची सुरूवात रेल्वे स्थानकापासून करण्यात आली. त्यात पालघर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सिकंदर शेख, डहाणू तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, जि.प सदस्या विपुला सावे, राजेश अधिकारी महिला आघाडी अध्यक्षा राजश्री अहिरे आणि सुमारे एक हजार स्त्री पुरु ष सहभागी झाले होते. प्रांत प्रशाली दिघावकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलिस अधिकारी, महसूल, वीजमंडळ, सा.बां. खाते आरोग्य आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात या भागात चाललेली शिवसेनेची दादागिरी थांबवा, वाढवण आणि नांदगाव जेटी हे प्रकल्प बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा, वीज बिले रास्त द्या, वनहक्क पट्टे मंजूर करा, रस्ते दुरुस्त करा, सुसरी धरण रद्द करा या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करून ते सोडविण्याचा प्रयत्न प्रशाली दिघावकर यांनी केला.
तत्पूर्वी प्रांत कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्या नंतर त्यांत बोलताना राजेंद्र गावित यांनी कितीही अडचणी आल्या आणि वाटेलती किंमत मोजावी लागली तरी आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला तसेच धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यास विरोध करण्यात येईल, असे सांगितले शिवसेना भाजप यांनी समान नागरी कायदा आणण्याचा घाट घातला असून तो हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही गावित यांनी संगितले. (वार्ताहर)