करवाढ टाळून वसई-विरारकरांना दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:03 AM2021-03-05T00:03:14+5:302021-03-05T00:03:23+5:30
महापालिकेचा अर्थसंकल्प : अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासक गंगाथरन डी. यांना केला सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार शहर महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी प्रशासक गंगाथरन डी. यांना सादर केला. महापालिकेचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात यंदा काेणत्याही प्रकारची करवाढ सुचवलेली नाही. त्यामुळे काेराेना काळातील लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना माेठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात आराेग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करतानाच वसईतील कला-क्रीडा क्षेत्र आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी एक काेटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेचा २०२०-२१चा सुधारित १८७०.७४ कोटी व २०२१-२२चा मूळ २०००.२८ कोटींचा अर्थसंकल्प आहे. २०२१-२२ या मूळ अर्थसंकल्पात कोणताही कर आणि दरवाढ सुचवलेली नाही. हा अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण कोल्हे, मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, उपसंचालक नगररचना विभाग वाय. एस. रेड्डी, लेखा विभागाच्या अनुजा किणी, मिलिंद पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. परिणामी, कोविड-१९ मुळे रखडलेली विकासकामेही यावर्षी मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात असेल, अशी माहिती यावेळी महापालिका सूत्रांनी दिली.
बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे म्हणजे अखेर उशिरा का होईना, पण वसईच्या चिमाजी आप्पा किल्ल्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर वसईचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक कोटींची तरतूद आहे. तसेच जुने रस्ते आता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सुटावी, यासाठी पालिकेने विशेष जोर दिला आहे. यासाठी प्रशासनाने बायोमिथेन व बायोमायनिंगसाठी १४७.५४ कोटींचा प्रकल्प शासनाकडे सादर केला आहे.
तर दुसरीकडे सफाईसाठी यांत्रिक झाडू शहरात लवकरच येणार असल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी
nअर्थसंकल्पात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेसाठी १०.४८ कोटींची तरतूद
nमागासवर्गीय योजनांसाठी २९.६४ कोटींची तरतूद
nखोलसापाडा धरण टप्पा १ व टप्पा २ बांधण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. यासाठी २३१.९० कोटींची तरतूद केली आहे.
nचिमाजी आप्पा किल्ला संवर्धनासाठी एक काेटींची तरतूद
nसांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक काेटींची तरतूद