सततच्या पावसाने विक्रमगडातील भातरोपे कुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:42 PM2019-09-07T23:42:34+5:302019-09-07T23:42:40+5:30
पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान :भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे जर पाऊस अजून लांबल्यास पावसाच्या या सातत्यामुळे भातशेती हे प्रमुख पीक अडचणीत येणार आहे.
सर्वत्र भात लावणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. गेल्या बारा दिवसापासून सततचा पाऊस बरसत आहे. बारा दिवसापासून शेतात पाणी भरून रोपे बुडून गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयाची भात पिकाची रोपे कुजली आहेत. अद्यापही पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकºयाच्या मुखीचा घास हिरावून घेतला जातो की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पुरामुळे विक्रमगड तालुक्यातील काही भागातील भातरोपे वाहून गेली आहे. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत तर काहीच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली गेली आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे. झालेल्या शेतकºयाच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी हवे होते
मात्र तो मुसळधारपणे कोसळत आहे. लावणी झालेल्या भातपिकाची शेतामध्ये पाणी भरून असल्याने पिके पाण्यात बुडून आहेत. पिकाची मुळे व रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षात जसे भात पिकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.