नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संविधान रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:02 AM2019-12-31T00:02:37+5:302019-12-31T00:02:58+5:30
हजारो नागरिकांचा सहभाग
पालघर : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी संविधान सन्मान मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येऊन नागरिकत्व संशोधन अधिनियमाला पाठिंबा दर्शवत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या वेळी ‘हल्ला बोल हल्ला बोल, नक्षलवाद पे हल्ला बोल, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत सन्मान संविधान मंचच्या वतीने पालघर सर्कस ग्राउंडमधून हजारोंच्या संख्येने निघालेल्या नागरिकांनी शहर दणाणून सोडले. या वेळी शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती.
या वेळी भाजपाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सुधीर दांडेकर, उमेश गायकवाड, या संतोष जनाठे, बाबा कदम, मुकेश दुबे, नगरसेवक भावानंद संखे, अरुण माने, लक्ष्मीदेवी हजारी, भाजप जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, अरुण जैन आदी या रॅलीमध्ये उपस्थित होते. जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी न्या कायद्याला पाठिंबा दर्शविला. देशासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आणि लोकसभा व राज्यसभा यांनी पारित केलेल्या व राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी दिलेल्या कायद्याचे आम्ही समर्थन करतो, असा जयघोष रॅलीमध्ये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम ५१ ए नुसार संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था यांचा आदर करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे. संविधानाद्वारे स्थापित, संसदेने पारित केलेल्या सीएए कायद्याचे हिंसक विरोध करून पोलीस व प्रशासनावर दगडफेक करून सार्वजनिक संपत्ती नष्ट करणे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे या रॅलीत सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यात या कायद्याची त्वरित अंमलबजावणी करून घुसखोरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या रॅलीत करण्यात आली.
प्रवाशांचे हाल
सकाळी १० वाजता रॅली निघणार असल्याने पालघर स्थानकातील एसटी बसेस, सहा आसनी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई, गुजरात दिशेने जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गावागावात रिक्षा व एसटीची वाट पाहत अनेक प्रवासी उभे होते. तर मुंबईवरून आलेल्या काही प्रवाशांना चालत थेट आपले केळवे गाव गाठावे लागले.