वाकी, सारशी, ग्रा.पं.च्या नवीन कार्यालयांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:09 PM2019-11-20T23:09:33+5:302019-11-20T23:09:40+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष; जनसुविधा योजनेतील निधी मिळेना
विक्रमगड : ग्रामीण भागातील विकासकामे करण्यासाठी जनसुविधा योजनेची सुरूवात केली. मात्र याच जनसुविधा योजनेतून वाकी आणि सारशी या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयांचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. या बांधकामासाठी २०१३ - १४ या आर्थिक वर्षात १३ लाख ५३ हजार ३३६ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यातील सव्वा तीन लाखांचा पहिला टप्पाच देण्यात आला.
यात वाकी ग्रामपंचायतीने १३ व्या वित्त आयोगातील साडे तीन लाख एवढी रक्कम सहभाग म्हणून टाकून नवीन इमारत बांधकामासाठी एकूण ६ लाख ७५ हजार खर्च करण्यात आला. तर सारशी ग्रामपंचायतीला ३ लाख २५ हजार देण्यात आले. यातच पायाभरणी, कॉलम भरणे, भिंतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम सहा वर्षे होऊनही शासनाने ग्रामपंचायतींना वर्ग न केल्याने या इमारती अपूर्ण अवस्थेत आहेत.
जनसुविधा योजनेतील उर्वरित निधी न मिळाल्याने वाकी तसेच सारशी या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. पुढील निधी मिळावा यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे.
वाकी ग्रामपंचायत नवीन कार्यालय बांधकाम निधी अभावी रखडले आहे. केलेल्या बांधकामचे मूल्यांकन करण्यात आले असून पुढील निधी शासनाने दिल्यास ग्रामपंचायती रखडलेल्या नवीन कार्यालयांची बांधकामे करतील.
- मनोज अंबोरे (शाखा अभियंता, पं.स.विक्र मगड)
माझी वाकी ग्रामदान मंडळमध्ये नुकतीच अध्यक्ष (सरपंच) पदी निवड झाली असून, या नवीन कार्यालय इमारतीचे बांधकामाबाबत चौकशी केली असता शासनाने उर्वरित निधी न दिल्याने ही कार्यालये अपूर्ण अवस्थेत आहेत. पुढील निधी शासनाकडून मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करून परत मागणी करू. - नरेंद्र भडांगे, अध्यक्ष, सरपंच
ग्रामदान मंडळ वाकी
शासनाने जन सुविधा योजनेतून वाकी, सारशी या ग्रामपंचायतींना नवीन कार्यालये बांधकामांना मंजुरी दिली. पण केवळ सव्वा तीन लाख दिले. उर्वरित निधी न दिल्याने कामे अपूर्ण आहेत. यामुळे जनसुविधा योजनेचा शासनानेच बोजवारा उडवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.
-रमेश कुºहाडा, माजी उप सभापती,
पंचायत समिती विक्र मगड