भररस्त्यात स्मारक उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:24 PM2019-08-30T23:24:27+5:302019-08-30T23:24:31+5:30

भाईंदरमधील प्रकार : नागरिकांनी व्यक्त केला संताप, वाहतुकीला होणार अडथळा, सुरक्षित जागी बांधण्याची मागणी

Construction work on the monument is underway | भररस्त्यात स्मारक उभारण्याचे काम सुरू

भररस्त्यात स्मारक उभारण्याचे काम सुरू

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्याची नवघर शाळा मैदानातली जागा बदलून भररस्त्यातच स्मारकाचे काम सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक सन्मानजनक जागी, प्रेरणादायी आणि सुरक्षित असावं, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. भररस्त्यात स्मारक उभारणं म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असून त्यामुळे स्मारकाचे पावित्र्य तर राहणार नाहीच, शिवाय वाहतुकीला अडथळा ठरणार असल्याने त्याचा आकार लहानच असणार आहे.


मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने नवघरनाका येथे स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शहरात ४० स्वातंत्र्यसैनिक असून एकट्या नवघर गावात २८ स्वातंत्र्यसैनिक आहेत. भार्इंदर गावातील ५, गोडदेव आणि खारी गावातून प्रत्येकी २ , तर उत्तन, मीरे व घोडबंदर गावातून प्रत्येकी १ स्वातंत्र्यसैनिक लाभले आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. महासभेत यास सर्वानुमते मंजुरी मिळाली होती.


२६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी या स्मारकाचे भूमिपूजन मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक अगस्तीन कोळी व आत्माराम भोईर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी ६३ लाख रुपये खर्चून पंचधातूचे स्मारक तीन महिन्यांत बांधून होईल. तसेच यासाठी २५ लाखांचा महापौर निधीसुद्धा देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी ते भररस्त्यात न उभारता मैदानाच्या दर्शनी भागात उभारण्याची सूचना केली होती. त्यानंतर, नवघर मैदानाच्या दर्शनी भागात स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. स्मारकाचा पाया आणि चौथरादेखील बांधून झाला. मात्र, अचानक महापालिकेने शाळा मैदान आणि हनुमान मंदिरामधील रस्त्यातच स्मारक उभारण्याच्या कामासाठी रस्ता खोदकाम सुरू केले. मैदानाच्या ठिकाणी काम सुरू केले असताना ते थांबवण्यात आले. आता नव्याने रस्त्यात काम सुरू केल्याने आधीचा खर्चदेखील वाया जाणार आहे. महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर भररस्त्यात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्यासाठी खोदकाम केल्याचे समजताच स्वातंत्र्यसैनिकांचे वारस व ग्रामस्थांनी याला विरोध केला. ठेकेदारास काम थांबवण्यास सांगितले असता, ठेकेदाराने थेट एका नेत्याचे नाव पुढे केले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या कर्तृत्वाला साजेसे हवे
स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक भव्य जागेत असायला हवं. त्यांच्या त्याग आणि कर्तृत्वाला साजेसं स्मारक हवं. स्मारक प्रेरणादायी असावं. त्यासाठी स्मारकाच्या सभोवतालीदेखील मोठा चौथरा, हिरवळ आणि सुरक्षाकठडा आदी असायला हवा. पण, भररस्त्यात स्मारक उभारणे म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे.
रस्त्यात स्मारक उभारण्याएवढी जागाच नाही. येताजाता वाहनचालक वा अन्य लोक गुटखा, मावा खाऊन थुंकतील. आजूबाजूला फेरीवाले वा वाहनचालक उभे राहतील. शिवाय, आधीच रस्ता लहान असल्याने वाहतुकीला अडथळा होईल, अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी रस्त्यात स्मारक उभारण्यास विरोध केला आहे.
नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंग यांनीदेखील येथे आधीच रस्ता अरुंद आहे. वाहतूक जास्त असते. रस्त्यात स्मारक उभारण्याबाबत पोलिसांना कल्पना नसून महापालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Construction work on the monument is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.