महावितरणच्या वाढीव विजबिलांमुळे ग्राहक कमालीचे हैराण; कार्यालयाबाहेर तक्रारींसाठी तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 05:16 PM2020-06-28T17:16:29+5:302020-06-28T17:17:06+5:30
-आशिष राणे वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग ...
-आशिष राणे
वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. मात्र ही देण्यात आलेली वीज देयके अवास्तव वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारी साठी वसईत विविध वीज कार्यालयांत ग्राहकांची तोबा गर्दी व मोठ्याला रांगा लागल्या आहेत.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती.
टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने ती अवास्तव वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी महावितरण ला केल्या आहेत.
मागील तीन दिवस झाले वसई तालुक्यातील सर्वच भागातील विज कार्यालयाच्या ठिकाणी वीज देयके कमी करण्यासाठी व त्याबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचं चित्र सर्वत्र दिसते आहे, जरी महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. तर आधीच टाळेबंदीत हाताला काम नाही अशामध्ये हजारोंच्या फरकाने आलेली वीज देयके कशी भरायची असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एप्रिल पासूनची वीज देयके ही एम.ई.आर.सी. यांच्या निर्देशानुसार जानेवारी ते मार्च या महिन्यांचे सरासरी वापराचे युनिट काढून ग्राहकांना देयके दिली आहेत. त्यामुळे देण्यात आलेली वीज देयके ही अचूक असल्याचे महावितरणतर्फे प्रभारी वसई अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
याउलट अधिक माहिती देताना अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांना वीजदेयके जास्त आल्याचे वाटत असेल त्यांनाही महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत वीज देयक कसे दिले आहे याची माहिती दिली जात आहे.
तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून वीज न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर काढून घेण्यात आलेले नाही तरीही ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले जात असल्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांनी केले आहे.
ग्राहकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका !
वीज देयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयात फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. आधीच वसई विरार शहरात करोना प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे त्यातच आता ग्राहकांना वीज बिल भरमसाट आल्याने कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नसल्याने ग्राहकांना सरासरी वीज देयके काढण्यात आली आहेत. जून महिन्यापासून मीटर घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील.
– मंदार अत्रे, अधीक्षक, (प्रभारी) अभियंता महावितरण वसई