वादग्रस्त बॅनर अखेर हटवला
By admin | Published: February 14, 2017 02:37 AM2017-02-14T02:37:44+5:302017-02-14T02:37:44+5:30
बहुजन विकास आघाडीने आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाच्या बॅनरवर हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती आणि भारतरत्न बाबासाहेब
वसई : बहुजन विकास आघाडीने आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाच्या बॅनरवर हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती आणि भारतरत्न बाबासाहेब या राष्ट्र पुरुषांच्या फोटोवर आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावल्यामुळे शिवसेना विरुद्ध बविआ असा सामना रंगला होता. मात्र, स्थानिक नगरसेविक सुषमा दिवेकर यांनी हस्तक्षेप करीत बॅनर काढून टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
नालासोपारा पश्चिमेला कोकण महोत्सव २०१७ ला सुरुवात झाली आहे. २५ ङ्खफेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन बहुजन विकास आघाडीने केले आहे. तसा बॅनर ठळकपणे उभारण्यात आला आहे.
त्यावर आयोजक म्हणून प्रवीण कुडन आणि दिलीप कांबळे यांचे फोटो टाकण्यात आले आहेत. तर येथील नगरसेविका सुषमा दिवेकर या स्वागत करतांनाचा ठळक फोटो दिसून येत आहे. त्यामुळे दिवेकर या महोत्सवाच्या प्रमुख आयोजक असल्याचे बोलले जात आहे.
त्याखाली स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका म्हणून त्यांचे नावही छापण्यात आले आहे. तर बॅनरच्या सर्वात वरच्या बाजुला मोठ्या टाईपमध्ये स्थानिक नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्यात अनुक्रमे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर,महापौर प्रविणा ठाकूर,आमदार क्षितीज ठाकूर,वसई विकास बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे, आघाडीचे संघटक सचीव अजीव पाटील,नगरसेवक प्रशांत पाटील, सभापती रुपेश जाधव,युवा नेता सिद्धार्थ ठाकूर,सभापती पंकज चोरघे,पंकज ठाकूर,उपमहापौर उमेश नाईक आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या फोटोचा समावेश
आहे.
या सर्व स्थानिक महारथींच्या फोटो खाली मात्र,लहान आकारात हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र पुरुषांचे फोटो छापण्यात आले
आहेत.
शहराच्या मुख्य रस्त्यावर दर्शनी ़जागेवर हे बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नेत्यांच्या फोटोखाली राष्ट्र पुरुषांचे फोटो लावण्यात आल्यामुळे राष्ट्रप्रेमी संतप्त झाले आहेत.दोन महाविभूतींचा हा जाहीर अपमान आहे.ज्यांना हा प्रोटोकॉल कळत नाही.ते विकास काय करणार.असा सवाल सोशल मिडीयावर विचारला जात आहे.
लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम घेताना अशाप्रकारे राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे गुन्हा आहे. त्याची पोलीसांनी स्वत: दखल घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हे बॅनर ताबडतोब हटवण्यात यावे, अन्यथा हे बॅनर हटवण्यासाठी शिवसेना समर्थ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंंपळे यांनी दिली.
तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी नालासोपारा पोलीस ठाण्याकडे स्वत: करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जर ती प्रत्यक्षात केली गेली तर पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)