स्वयंपाकघरातून तांबा-पितळेची भांडी झाली कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:48 PM2020-02-01T23:48:22+5:302020-02-01T23:48:49+5:30
ग्रामीण महिलांच्या जीवनशैलीत बदल
- राहुल वाडेकर
विक्रमगड : अनेक वर्षापासून घरोघरी जेवण शिजविण्यासाठी वापरली जाणारी पिढीजात तांबा-पितळेची भांडी सध्याच्या धावपळीच्या व आधुनिक युगामध्ये ग्रामीण महिलांच्या स्वयंपाकघरातून कालबाह्य झाल्याचे चित्र दिसत आहे. या भाड्यांचा आरोग्यदायी उपयोग माहिती असतानाही बदलत्या जीवनशैलीत झटपट अन्न तयार करण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या स्टेनलेस स्टील, फायबर किंवा इतर धातूंच्या भांड्यांना जवळ करीत तांबा, पितळेच्या भांड्यांना कालबाह्य केले आहे.
आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्यांची भांडी सर्रास वापली जात होती. चुलीत लाकडे जाळून अन्न तयार करताना या भाड्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते, परंतु आताच्या आधुनिक युगामध्ये चुलीऐवजी स्टोव्ह, गॅस, शेगडी अशा विविध व झटपट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वजनाने हलक्या धातूंच्या भांड्यांना महत्त्व आले.
आता सर्रासपणे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या धातूंपैकी काही धातूंच्या भाड्यांत अन्न शिजविणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याकडे अनेकदा लक्ष वेधले गेले असले तरी या धातूच्या भांड्यांचा वापर कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. या भाड्यांवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही असेही म्हटले आहे. तर अनेक जण सध्या जुनी परंपरागत पिढीजात पितळी व तांबेची भांडी कवडीमोल भावाने सर्रासपणे मोडीत काढीत आहेत आणि त्याऐवजी दुसºया धातूंची भांडी घेतली जात आहेत. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा याचा वापर देवपूजेत अधिक होत असे. मात्र तेही साहित्य सध्या मोडीत निघायला लागले आहे.
स्टेनलेस स्टील किंवा थेट चांदीच्या वस्तू देवघरात दिसू लागल्या आहेत. ज्याच्या घरात तांब्या-पितळेची भांडी अधिक तशी त्यांची श्रीमंतीही लक्षात यायची. ज्यांनी ही भांडी मोडीत काढली नाहीत त्यांनी ती स्वयंपाकघरातून केवळ शोभेपुरती ठेवली आहेत. तांब्या पितळ्याच्या भाड्यांचा लग्नात आहेर करण्याची पद्धत बंदच झाली आहे. रुकवतातही स्टेनलेस स्टीलने घुसखोरी केली आहे. तांबा आणि पितळेची भांडी भविष्यात भावी पिढीसाठी ऐतिहासिक ठेव्याप्रमाणे वाटली तर नवल वाटणार नाही.