कोरोनाने डहाणूतील फुगे कारखाने बंद, कामगारांची उपासमार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:10 AM2021-05-07T00:10:46+5:302021-05-07T00:11:05+5:30
शौकत शेख डहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या डहाणूत हजारो भूमिपुत्रांना काम देणारे फुगे कारखाने गेल्या दीड महिन्यापासून बंद ...
शौकत शेख
डहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या डहाणूत हजारो भूमिपुत्रांना काम देणारे फुगे कारखाने गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुशल, अकुशल कामगारांबरोबरच घरच्या घरी फुगे पॅकिंग, छपाई, प्रिंटिंगचे काम करणाऱ्या महिलांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर भर संचारबंदीत बाहेरही कुठे काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या दारिद्रय रेषेखालील गरीब मजुरांची मदत करण्याची मागणी आगवन गावचे उपसरपंच रुपजी कॉल यांनी केली आहे.
डहाणू तालुक्यात १९६२ पासून सुमारे दीडशे फुगे कारखाने होते. कच्च्या रबरावर प्रक्रिया करून पारंपरिक पद्धतीने उत्पादित केल्या जाणाऱ्या डहाणूच्या मनमोहक रंगीबेरंगी फुग्याला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असते. त्यामुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या कारखान्यात सुमारे १५ ते २० हजार कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु जागतिक बाजारपेठेत दररोज वाढणारे रबराचे दर, त्यातच चायना तसेच श्रीलंका येथील दर्जेदार, टिकावू, फॅन्सी आणि स्वस्त फुग्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केल्याने दिवसेंदिवस डहाणूतील फुग्यांची मागणी कमी होत आहे. त्यामुळे असंख्य फुगे कारखाने आर्थिक संकटात सापडून बंद पडू लागले.
डहाणूत सध्या ३० ते ३५ फुगे कारखाने आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्याद्वारे हजारो स्थानिक महिला पुरुषांना रोजीरोटी मिळत आहे. दरम्यान, डहाणूत वडकून, आगवन, सरावली, आशा गड, गंजाड, साव टा. देहणे, रायतली आदी भागात पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणारे फुगे कारखाने आहेत. या कारखान्यात काम करणाऱ्या आदिवासींबरोबरच माच्छी समाजातील महिला कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. या कामगारांना दर आठ दिवसांनी पगार दिला जातो. परंतु एप्रिलपासून कोरोनाने पुन्हा डोके वर केल्याने शासनाने कारखाने बंद करण्याचे आदेश दिलेत. परिणामी कामगारांची उपासमार होत आहे.