नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला कोरोना-ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:23 AM2020-08-02T01:23:41+5:302020-08-02T01:24:25+5:30

जिल्ह्यातील मच्छीमार तरुणांमध्ये नाराजीचा सूर । यंदा शांततेत होणार समुद्राची पूजा, शेकडो वर्षांची परंपरा खंडित

Corona-eclipse to the excitement of the coconut full moon | नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला कोरोना-ग्रहण

नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला कोरोना-ग्रहण

Next

हितेन नाईक ।

पालघर : ‘सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा, मन आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा!’, ‘अरे बेगीन, बेगीन चला किनारी जाऊ देवांच्या पूजेला, हात जोडूनी नारळ सोन्याचा देऊया दर्याला!’ असे पारंपरिक वेषभूषेत बँडच्या तालावर नाचत-गात सोनेरूपी नारळ समुद्राला अर्पण करण्याच्या मच्छीमारांच्या उत्साहाला यंदा कोरोनारुपी संसर्गाचे ग्रहण लागले आहे. मनाई आदेश असल्याने शेकडो वर्षाच्या परंपरेला या वर्षी छेद देत सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करत पहिल्यांदाच मच्छीमारांना शांतपणे समुद्राची पूजा करावी लागणार आहे.

१ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी संपल्यावर समुद्रापासून दोन महिने दूर राहिलेला मच्छीमार बांधव पुन्हा समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळायला आणि तुफानी लाटांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेला असतो. बंदीच्या कालावधीत मच्छीमार किनाऱ्यावर शाकारलेली आपली बोट समुद्रात मासेमारीला उतरविण्याच्या दृष्टीने बोटीची डागडुजी, रंगरंगोटी, नवीन जाळी भरणे, इंजिन दुरुस्ती आदी कामे आटपून घेण्याच्या तयारीत व्यस्त असताना महिला वर्ग, तरुण-तरुणी वरिष्ठांना मदत करून नारळी पौर्णिमेच्या महिन्यापूर्वीआधीच कोळीवाड्यांत हा सण साजरा करण्याचे बेत रंगवू लागतात. मनाजोग्या लुगड्यांची, दागिन्यांची, हातातला चुडा आदी साहित्य जमविण्याच्या, खरेदीच्या कामाला लागतात. तर तरुण मुले बेंजो, सोनेरूपी नारळाची तयारी करणे, कोळी गाण्यावर नृत्य बसविणे आदींचा सराव करण्याची धावपळ सुरू असते.
जिल्ह्याला वसई ते झाई-बोर्डी असा ११० किमीचा किनारा लाभला असून किनारपट्टीवरील सर्व गावांत नारळी पौर्णिमेचा उत्साह ओसंडून वाहत असतो. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने किनारपट्टीवरील अनेक गावांत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने तरुणांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनाई आदेशासह अनेक बंधने घालण्यात आली असून लॉकडाऊन घोषित करून जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांत ३४२ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. किनारपट्टीवरील सातपाटी, दांडी, झाई, घोलवड, डहाणू, चिंचणी, माहीम, खारेकुरण, केळवे आदी गावे कोरोना संसर्गाची ‘हॉटस्पॉट’ ठरली आहेत. त्यामुळे मनाई आदेशाची अंमलबजावणी करून पोलीस ठाण्यांनी कुठलीही मिरवणूक काढणे, वाजंत्री यावर २५ मार्चपासून बंदी घातली आहे. वसईपासून ते थेट झाई-बोर्डीदरम्यानच्या किनारपट्टीवर सर्वच गावात नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहावयास मिळत असले तरी मिरवणूक, डान्स आदी कार्यक्रमांना परवानगी नसल्याने तरुणांमध्ये नाराजी आहे. सातपाटीमधील भाटपाडा गणेशोत्सव मंडळ, मुरबे येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमा सण साजरा करीत असताना पहिल्यांदाच या सणावर कोरोनाचे संकट आल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे भाटपाडा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी भारत देव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रत्येक वर्षी या नारळी पौर्णिमेच्या नृत्याची मेजवानी चाखायला पालघर, बोईसर आदी भागातून रसिक येत असतात. मात्र यंदा या मनोरंजनात्मक सोहळ्याला रसिकवर्ग मुकणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची कडक बंधने असली, तरी अंगावर दागदागिने घालून पावडर, लिपस्टिक लावून तोंडावर मास्क लावण्याचे बंधन मात्र तरुण मुलींच्या पचनी पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्या उत्साहावर यंदा मोठे विरजण पडले असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून सण साजरे करण्याची परवानगी मिळणार नाही का? अशी सुप्त मागणीरूपी इच्छा मच्छीमार मुलींच्या मनात घोळत आहे.

खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात
च्शनिवारी १ आॅगस्टपासून दोन महिन्यांचा पावसाळी बंदी कालावधी संपल्याने खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असून सातपाटी, मुरबे, दांडी-उच्छेळी, नवापूर, वडराई, केळवे, एडवन, अर्नाळा, वसई, नायगाव आदी भागातील नौका मासे पकडण्यासाठी सकाळी समुद्रात रवाना झाल्या.

च्‘समुद्र देवा, वादळी वारे शांत ठेवून आमच्या धन्याला सुखरूप ठेव आणि आमच्या नौका मासेरूपी दौलतीने भरभरून येऊ दे’ अशी प्रार्थना समुद्राला सोनेरूपी नारळ अर्पण करून सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी महिलावर्ग करणार आहेत.

च्विक्रमगड, चारोटी, जव्हार, वाडा आदी भागांत व्यवसायानिमित्त राहत असलेल्या मच्छीमार समाजातील लोक एकत्र येत सजूनधजून नाचतगात डोक्यावर घेतलेला सोनेरूपी नारळ समुद्राला अर्पण करीत असतात. समुद्रात जाणाºया बांधवांच्या बोटीला भरपूर मासे मिळावेत, तसेच तुफानी लाटा, वादळीवाºयापासून रक्षण कर, अशी प्रार्थना करीत असतात.

Web Title: Corona-eclipse to the excitement of the coconut full moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.