पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत ४०४ जणांचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:59 PM2021-04-22T23:59:31+5:302021-04-22T23:59:37+5:30

नागरिकांच्या बेफिकिरीचा परिणाम

Corona killed 404 people in rural areas of Palghar district | पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत ४०४ जणांचा कोरोनाने घेतला बळी

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत ४०४ जणांचा कोरोनाने घेतला बळी

Next



हितेन नाईक/सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर / पारोळ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असतानाच आता रुग्णांचे मृत्यूही होत असल्याने कोरोना हा अनेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, सरकारने संचारबंदीचे कडक निर्बंध लागू केलेले असतानाही काही बेफिकीर नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे वगैरे बाबी आवश्यक आहेत, मात्र बेफिकीर नागरिकांकडून त्याचाच अवलंब केला जात नसल्याचे सातत्याने आढळून आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.  विशेषतः पालघर तालुक्यामध्ये जास्त रुग्ण आढळले असून या तालुक्यात  १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर डहाणू तालुक्यामध्ये ४७ जणांचा प्राण गेला आहे. जव्हार तालुक्यामध्ये २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. वाडा तालुक्यामध्ये ६० जण मृत्यू पावले आहेत. वसईच्या ग्रामीण परिसरात ५० जण दगावले आहेत. मोखाडा तालुक्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रमगड तालुक्यात १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तलासरी तालुक्यात ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके आदिवासीबहुल असून या भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने आणि कोविड रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.


जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर करणे आणि सामाजिक अंतर पाळणे ही त्रिसूत्री अवलंबली पाहिजे. 
- अरविंद पाटील, सरपंच, सातपाटी


वसई तालुक्यात शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गावागावात मृत्यूही होत असल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.     - नीलेश दिनकर पाटील, अध्यक्ष, जनसेवा फाऊंडेशन

Web Title: Corona killed 404 people in rural areas of Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.