वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:50 PM2021-04-20T23:50:38+5:302021-04-20T23:51:12+5:30

चिंता वाढली : बाधितांसह मरण पावणाऱ्यांचा वाढतोय ग्राफ 

Corona kills 50 in 10 days in Vasai-Virar | वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर/वसई : जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट महापालिका हद्दीमध्ये कहर माजवत असून गेल्या १० दिवसांत तब्बल ७ हजार २७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीसह कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वाढता ग्राफ आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा ठरला आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी ८७९ नवीन रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. त्याआधी ११ एप्रिल रोजी ७५४ नवीन रुग्ण आढळले होते, तर २४१ जण बरे होऊन घरी परतले होते. १२ एप्रिल रोजी ४९२ नवीन रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. ३१४ जणांनी कोरोनावर मात केली होती. १३ एप्रिल रोजी ७०६ नवीन रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. २६६ जण बरे झाले होते. १४ एप्रिल रोजी ६४१ जण बाधित झाले होते, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. १५ एप्रिल रोजी ५९८ नवीन रुग्ण आढळले होते. या दिवशी एकही रुग्ण दगावला नव्हता. ३४८ जणांनी कोरोनावर मात केली होती. १६ एप्रिल रोजी ७८४ नवीन रुग्ण आढळले होते, तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. ३६७ जण बरे झाले होते. १७ एप्रिल रोजी ८१४ जण बाधित ठरले होते, तर ८ जणांनी आपले प्राण गमावले होते. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ९०८ रुग्ण नवीन आढळले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली होती. १९ एप्रिल रोजी ७०८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ८ जणांना आपले जीव गमवावे लागले होते आणि ४४२ जण बरे होऊन घरी परतले होते. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या दहा दिवसांतील ही वाढती आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

११ एप्रिलपासून ३,०१४ जणांची कोरोनावर मात 
गेल्या दहा दिवसांत एकीकडे ६ हजार ३९९ रुग्ण आढळलेले असताना दुसरीकडे मात्र ३ हजार १४ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात वाढत असलेले नवीन रुग्ण आणि मृत्यूचा ग्राफ पाहता नियम पाळणाऱ्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे.

आकडेवारी चिंताजनक 
महापालिकेने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील हे आकडे आहेत. मृतांच्या आकडेवारीत लवपाछपवी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे आकडे चिंताजनक आहेत.

यंत्रणेवर वाढला ताण
गेल्या १० दिवसांत महानगरपालिका हद्दीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा सुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.

Web Title: Corona kills 50 in 10 days in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.