जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:28 AM2021-01-16T00:28:00+5:302021-01-16T00:28:08+5:30
१७,४११ पैकी पहिल्या टप्प्यात ६०० जणांना देणार डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात ६०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १७ हजार ४११ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आलेली असून १९ हजार ५०० डोस उपलब्ध झालेले आहेत.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी नुकतीच ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेते वेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती ओळखपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
जिल्ह्याला ही लस प्राप्त झाली आहे, मात्र १९ हजार ५०० एवढेच डोस मिळालेले असल्याने प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात ८०० ऐवजी ६०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६ लसीकरण केंद्रे कार्यरत केली गेली आहेत.
आशा, डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य
पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना तसेच शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.