Corona Virus: पालघर जिल्ह्यातील यात्रा-शाळा बंद; ‘कोरोना’बाबत अफवांचे पीक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:18 PM2020-03-13T23:18:23+5:302020-03-13T23:18:50+5:30
काही कार्यक्रम रद्द, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पालघर/वसई : पालघर शहरात दुबईवरून आलेल्या ८ रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे सोशल मीडियावरून फिरणारे वृत्त एक अफवा असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत शासन पातळीवरून अजूनही निर्देश आले नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. मात्र सर्व यात्रा रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वसई-विरारसह अनेक भागांतील काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तर अनेक शाळाही बंद ठेवल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालघरमधील डॉ. पाटकर गल्लीतील एक इसम दुबईवरून ५ मार्च रोजी आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी जात त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोरोना आजाराबाबत कुठलीही लक्षणे दिसून आल्याची नसल्याचे डॉ. सागर पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बोईसरमधील दोन हॉटेल्समध्ये चायना-तैवान आणि चिली देशातून व्यवसायानिमित्त ४ मार्च रोजी आलेल्या लोकांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा उप शल्य चिकित्सक डॉ. केळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, कोरोना या जीवघेणा विषारी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वसईच्या सनसिटी मैदानावर होणारा मुस्लिमधर्मियांचा तब्लिकी इज्तेमा कार्यक्रम सध्या स्थगित करून पुढे ढकलण्यात आला आहे. दि १४ आणि १५ मार्च रोजी संपन्न होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलून पुढील महिन्यात दि. ११ व १२ एप्रिल रोजी सनसिटी मैदानावरच होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्यात रीतसर पत्र देखील देण्यात आले आहे.
इज्तेमा हा कार्यक्रम मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा असतो, हाच इज्तेमा यंदा १४ व १५ मार्चला वसईच्या सनसिटी मैदानावर शमीम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीमार्फत वसईत होणार होता. यासाठी वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, मुंबई यासह आजूबाजूच्या परिसरातील लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार होते. या कार्यक्रमात मुस्लिम धर्मगुरू (मौलाना) प्रवचन करून मार्गदर्शन करतात. ३८ वर्षांनंतर प्रथमच हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने किमान ४० हजारहून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
नागरिकांना आवाहन
या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाºया, शिंकणाºया व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरांनी कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास जिल्हा शल्याचिकित्सक डॉ.कांचन वानेरे ९८९०९०६६१७, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी-९००४८१४४१२, डॉ.स्मिता वाघमारे- ९९८७२४०७५० येथे त्वरित संपर्क साधावा.
‘त्या’ परदेशी पर्यटकांवर करडी नजर : जिनिव्हातील तिघे डहाणूत
डहाणू : जगभर थैमान घालणाºया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी पर्यटकांवर संशयाची सुई रोखली गेली असून शुक्रवारी जिनिव्हा येथून डहाणूत आलेल्या तीन पर्यटकांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोनाची लक्षणे तपासली जाणार आहेत.
जिनिव्हा येथून पर्यटक म्हणून आलेले हॉलडीनर, डुलेट आणि सायमिन रोनियन हे प्रथम मुंबई येथे दि. ८ मार्च रोजी दाखल झाले. या तिघांचा व्हिसा २३ मेपर्यंत वैध आहे. मुंबईहून हे तिघे जण डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील मौर्या हॉटेलात उतरले. येथे त्यांचा मुक्काम तीन दिवस राहणार आहे.
याबाबत हॉटेल व्यवस्थापकांना समजताच त्यांनी वाणगाव पोलीस ठाण्याला संबंधित पर्यटकांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलात दाखल झालेल्या परदेशी पर्यटकांची चौकशी केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी संबंधित प्रशासन यंत्रणेला कळविले आहे.