Corona Virus: कोरोनाचा धसका! पोल्ट्री व्यावसायिक संकटात; जिवंत पिलांना खड्ड्यात गाडण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:15 PM2020-03-10T23:15:06+5:302020-03-10T23:15:19+5:30
सात लाख अंडी व दीड लाख नवजात पिलांना खड्ड्यात गाडण्याची वेळ
कासा : कोरोना विषाणूच्या भीतीपोटी नागरिकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने मोठ्या प्रमाणात चिकण विक्री कमी झाल्याने कुकुटपालन व्यवसायावर व परिणामी हॅचरी व्यावसायिकांवर मोठे संकट उद्भवले आहे. यंदाच्या होळीच्या हंगामामध्ये कोंबडीच्या चिकनला उठाव नसल्याने डहाणू तालुक्यातील एका हॅचरी मालकाने सात लाख अपूर्ण उबलेली अंडी तसेच पावणेदोन लाख नवजात कोंबड्यांची पिल्लांना नाईलाजाने जमिनीमध्ये पुरण्याची वेळ आली आहे.
पोल्ट्री व्यावसायिक डॉ. सुरेश भाटलेकर यांचा डहाणू तालुक्यातील गंजाड (ढाकपाडा) येथे हॅचरी व पोल्ट्री उद्योग असून सद्यस्थितीत त्यापैकी दहा शेडमध्ये सुमारे ९० हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार अवस्थेमध्ये आहेत. त्यांना बाजारामधून आवश्यक प्रमाणात उठाव नसून कोंबडीच्या पिल्ल्यापासून सुमारे एक ते दीड किलोची कोंबडी ४० दिवसांच्या अवधीत तयार होत असून त्यावर कुकुटपालन केंद्राच्या मालकाकडून ७५ रुपयांचा खर्च होतो. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मांसाहार व चिकण खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने या कुकुटपालन व्यावसायिकरण समोर संकट उभे राहिले आहे.
तालुक्यातील या हॅचरी व कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कोंबडीला उठाव नसताना नव्याने पिल्ले तयारीसाठी आलेली सुमारे सात लाख अंडी या हॅचरी मालकाने खड्ड्यामध्ये फोडून पुरली आहे. त्याचप्रमाणे डबघाईला आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात नव्याने निर्माण केलेल्या सुमारे दीड ते पावणेदोन लाख कोंबडीच्या पिल्लांना खाद्य देण्यासाठी पैसे नसल्याने अशा अपूर्ण वाढ झालेल्या नवजात पिलांना देखील खड्ड्यात पुरण्याची नामुष्की ओढावली आहे. या व्यवसायाला आगामी काळात मर्यादित प्रतिसाद लाभणार या शक्यतेपोटी हॅचरी कर्मचारी निम्म्यावर आणला असून नोकरीनिमित्ताने मराठवाडा व इतर ठिकाणाहून आलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्याचप्रमाणे कुकुटपालन क्षेत्रात खाद्य म्हणून लागणाºया मक्याची मागणी कमी झाली असून त्याच्या दरांमध्ये देखील सुमारे सहा रुपये प्रति किलो अशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. एक कोंबडी तयार करण्यासाठी साधारण प्रतिकिलो ७५ रुपये खर्च येत असून सध्या घाऊक बाजारपेठेत तालुक्यात १५ ते २० रुपये प्रति किलो इतक्या दराने जीवंत कोंबड्यांचे पक्ष्यांची विक्र ी होत असून कुकुटपालन व्यवसाय करणाºया तसेच हॅचरी उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे.
दरम्यान हॅचिंगसाठी अंडी छत्तीसगड, हैदराबाद, बेंगलोर, औरंगाबाद येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून व वेगवेगळ्या कंपनीकडून गंजाड (ढाकपाडा) येथे येत असून सदर अंडी उबवण्यासाठी १८ दिवस इनक्युबेटर व ३ दिवस हॅचरमध्ये ठेवून अशा २१ दिवसांत पिल्ले तयार होतात. मात्र चिकणमुळे कोरोना व्हायरस लागण होते. या अफवेमुळे चिकन मागणी घटल्याने अशी परिस्थिती हॅचारी व पोल्ट्री व्यावसायिकावर आली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी बाजारामध्ये चिकनला मागणी खूप कमी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या उपलब्ध असल्याने तसेच यापुढे पक्ष्यांना मर्यादित मागणी लक्षात घेऊन नाईलाजाने उबविलेली साठवलेली अंडी व अपूर्ण वाढ झालेली पिले यांची विल्हेवाट लावणी करणे भाग पडत आहे. - डॉ. सुरेश भाटलेकर, पोल्ट्री व्यावसायिक, गंजाड