Corona Virus: ‘कोरोना’च्या भीतीने आठवडा बाजार थंडावला; ग्राहकांनी फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:20 PM2020-03-13T23:20:00+5:302020-03-13T23:20:20+5:30
औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वाडा : तालुक्यातील कुडूस येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात हजारो ग्राहक वस्तू खरेदीसाठी येत असतात, मात्र सध्या कोरोना विषाणूची भीती असल्याने आजच्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बाजार थंडावल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांची बाजारात तुरळक गर्दी दिसून येत होती.
औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आज दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात असली तरी बाजाराचे महत्त्व कमी झालेले नाही. कुडूस ही ५२ गावांची बाजारपेठ असून लोकसंख्या सुमारे ५० ते ७५ हजारांच्या आसपास आहे. तसेच या परिसरात शेकडो कारखाने असल्याने हजारो कामगार येथे वास्तव्यास आले आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय नागरिक बाजारात येत असल्याने येथे मोठी गर्दी होत असते. हा बाजार सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो. या बाजारात घोटी, इगतपुरी, नाशिक, वसई, अर्नाळा, पालघर येथील व्यापारी आपला माल घेऊन येत असतात.
गर्दीत जाणे टाळा...
सध्या कोरोना व्हायरसची नागरिकांना भीती वाटत असल्याने प्रशासनाकडूनही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी भीतीपोटी गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद केल्याने कुडूसचा बाजार थंडावल्याचे दिसून आले.