जिल्ह्यातील आश्रमशाळा ‘हाॅटस्पाॅट’, हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:00 AM2021-03-18T10:00:13+5:302021-03-18T10:00:28+5:30
नंडोरे आश्रमशाळेत ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे.
पालघर : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पालघरमधील नंडोरे आश्रमशाळेतही एका शिक्षकासह २४ विद्यार्थिनी आणि ६ विद्यार्थी असे एकूण ३१ जण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आश्रमशाळा कोरोना हाॅटस्पाॅट ठरत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष पुरविले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नंडोरे आश्रमशाळेत ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे. त्याच वेळी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर पालकांच्या आई-वडिलांनी आश्रमशाळेकडे धाव घेत शाळेला घेराव घातला. आपल्या मुलांची आम्हाला भेट हवी, असे सांगून काही पालकांनी आपल्या पाल्यांना घरी घेऊन जायची मागणी केली. यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी आपल्या पाल्यांवर योग्य ते औषधोपचार करून त्यांची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिल्यावर पालकांनी आपला आग्रह सोडला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूअंतर्गत नंडोरे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ९वी ते १२वीपर्यंतचे १६२ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी ३४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. सोमवारी तीन विद्यार्थिनींना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यानंतर त्यांची तपासणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ आश्रमशाळा प्रशासनाने अन्य सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या तपासणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्या अहवालात २४ विद्यार्थिनी, ६ विद्यार्थी व एक शिक्षक अशा ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आश्रमशाळा व परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
कोरोनाची लागण झालेल्या व लक्षणे असलेल्या ९ विद्यार्थिनींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर सौम्य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगीकरण कक्ष उभारून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी दिली. संपूर्ण आश्रमशाळेची वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून आश्रमशाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जव्हारनंतर नंडोरेतही रुग्ण : ३१ बाधितांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश