Corona Virus: ‘कोरोना’पासून बचावासाठी पोलिसांच्या तोंडाला मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:00 AM2020-03-13T00:00:19+5:302020-03-13T00:01:20+5:30
कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रूप आणू नका तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या, घाबरू नका, पण सतर्क राहा.
नालासोपारा : वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये किंवा बचावासाठी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुरुवारी सकाळी ठाणे अंमलदार, दिवसाचे अधिकारी आणि स्टेशनला डायरीचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावण्याचे आदेश दिले आहे.
वसई तालुका परिसरातील नालासोपारा, विरार, अर्नाळा, वालीव, माणिकपूर, तुळिंज आणि वसई या सातही पोलीस ठाण्यामध्ये दररोज अनेक नागरिक तक्रारी, पासपोर्ट किंवा कोणत्या तरी कामानिमित्त येतात. हे लक्षात घेऊन कोरोना वायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा ठिकाणी जाऊ नका. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रूप आणू नका तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या, घाबरू नका, पण सतर्क राहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे कायद्याचे रक्षकही स्वत:च्या रक्षणासाठी मास्क वापरीत आहेत.