Corona Virus: वापरलेल्या मास्कचा साठा सापडला कचराकुंडीत; पोलीस, आरोग्य यंत्रणेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 10:55 PM2020-03-08T22:55:54+5:302020-03-08T22:56:29+5:30
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली तपासणी
नितीन पंडित
भिवंडी : वापरलेल्या मास्कचा बेकायदेशीर साठा भिवंडीतील एका गोदामात केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू असतानाच, हा साठा पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचराकुंडीत फेकून दिल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. कोरोना व्हायरसची सर्वत्र दहशत पसरत असताना मास्कचा काळाबाजार करण्याचा अज्ञात आरोपींचा उद्देश यंत्रणेने उधळवून लावला. सोशल मीडियाची सकारात्मक बाजू यानिमित्ताने दिसून आली.
जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना, या पार्श्वभूमीवर भारतातही तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील गोदामपट्ट्यात मोठ्या प्रमाणात परदेशातून भंगार साहित्य येते. त्यामध्ये परदेशांत वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने वापरलेले मास्क धुऊन पुन्हा विक्र ीसाठी आणण्याचा गोदाममालकांचा घाट असल्याचा व्हिडीओ शनिवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांसह आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली.
या व्हिडीओच्या आधारे ग्रामीण भागात यंत्रणेकडून तपास सुरू असताना, हे गोदाम वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाउंडमधील एका इमारतीमध्ये असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांसह आरोग्य कर्मचारी शनिवारी रात्रीच गोदामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले; परंतु रात्रीच्या वेळी कुणीच नसल्याने पाहणी करता आली नाही. रविवारी सकाळी पंचायत समिती सदस्य विकास भोईर हे ग्रामस्थांसह या गोदामात गेले असता, तेथील कामगाराने मास्कचा माल पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन शेजारी कचरा टाकण्याच्या जागेत टाकल्याची माहिती दिली.
साठा नष्ट करण्याचे आदेश
वापरलेले मास्क फेकून दिल्याने नेमकी कारवाई कुणावर आणि कुणी करायची, याबाबत अधिकाऱ्यांची बराच वेळ खलबते झाली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नारपोली पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.