फटाका व्यवसायाला कोरोनाचा फटका; ग्राहकांत ५० टक्के घट, नियमांचे पालन करूनच व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:13 AM2020-11-09T00:13:19+5:302020-11-09T00:13:32+5:30
यंदा मंदीचे सावट
- वसंत भोईर
वाडा : जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा दरवर्षी कल असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, कोरोना महामारीचे संकट कायम असल्याने मनात फटाके खरेदी करण्याची इच्छा असूनही ग्राहक बाहेर पडत नसल्याने या वर्षी मंदीचे सावट आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या ५० टक्केपेक्षाही कमी आहे. वाड्याला फटाके स्वस्त मिळत असल्याने किरकोळ व घाऊक विक्रेते या ठिकाणी येऊन फटाके खरेदी करतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय येथे चालत असून वर्षभरात करोडोंची उलाढाल होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे पूर्ण व्यवहार ठप्प असल्याने ग्राहक कमी प्रमाणात येत असल्याने या व्यवसायालाही कोरोना महामारीचा फटका बसला आहे.
सध्या फॅन्सी ॲटमची मागणी जास्त आहे. यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाउंटन, कलरगोळी, वंडरलाइट, स्वस्तिक व्हील, लायटिंग थंडर, मल्टीशाॅट, मल्टीबार, राॅबिट डान्सिंग, पॅराशूट, कलरबाॅल, स्काय वे, हंड्रेड शाॅट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तसेच सुतळीबाॅम्ब, जमीनचक्र, अनार, लवंगी फटाके इ. प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
रंगीत फटाके ३५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत, चक्री २२ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत, पाऊस २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत, रेडफोर्ड फटाका सात रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत, फुलबाजे रंगीबेरंगी ३५ रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत अशा किमती आहेत. येथे येणारे बहुतांश ग्राहक हे घाऊक फटाके विक्रेते आहेत. किरकोळ ग्राहक हे दिवाळी सणाच्या पाच ते सात दिवस अगोदर येऊन फटाके खरेदी करतात. या दिवसात दरवर्षी फटाक्यांची अनेक दुकाने रात्रंदिवस सुरू असतात. यंदा मात्र व्यापारी मेटाकुटीस आले आहेत.