आदिवासींकडील काजू खरेदी-विक्रीला कोरोनाची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:11 AM2021-04-22T00:11:26+5:302021-04-22T00:11:31+5:30
सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक नुकसान
हुसेन मेमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांत हजारो काजूची रोपे विविध संस्थांच्या माध्यमातून येथील आदिवासी बांधवांना लागवड करून देण्यात आली आहेत, तसेच जव्हारचे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांच्या जयविलास पॅलेसच्या अवतीभवती ३० ते ४० एकरमध्ये हजारो काजूची झाडे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात काजू बीचे उत्पादन निघते. त्यामुळे दरवर्षी शेकडो आदिवासी शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून काजू बीकडे पाहिले जाते. मात्र सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे काजू बी खरेदी-विक्रीला घरघर लागली आहे.
काजूच्या रोपाला या भागातील जमीन लाभदायक आहे. कमी पाण्यातही काजूची रोपे जगतात. फेब्रुवारी, मार्च महिन्यात काजूच्या झाडांना मोहोर येतो, तर मार्च ते मेपर्यंत काजू गर व काजू बिया तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. तालुक्यात काही सामाजिक संस्थांनी अनुसूचित जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना नियमित शेतीसोबत फळबागा लागवड करून दिल्या आहेत. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काजूची झाडे लावून मागील कित्येक वर्षांपासून काजू बी विकून उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहे.
काजू बी तयार झाल्यानंतर शेतकरी काजू बी जमा करतात व ते जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. तालुक्यातील व्यापारी प्रत्येक शेतकऱ्यांकडून दोन किलो, पाच किलो, १० किलो, २० किलो असा माल घेतात व त्याचा साठा करून ठेवतात. जसजसा मालाचा साठा वाढतो तसतसे हे शेतकऱ्यांकडून विकत घेणारे व्यापारी काजू तयार करणाऱ्या फॅक्टरी मालकांना विकतात. शेतकऱ्यांकडून साठा करणारे किरकोळ व्यापारी काजू बीच्या साईजनुसार भाव देतात. हा दर ९५ रुपयांपासून तर १४० रुपयांपर्यंत जातो. फक्त जव्हार तालुक्यात ८०० ते ९०० टन माल खरेदी-विक्री होतो.
आम्ही काजू बी खरेदी करतो, त्यात आम्हाला लहान-मोठ्या आकाराच्या बीचा फटकाही बसतो, मात्र वर्षानुवर्षे आम्ही काजू बी खरेदी-विक्री करीत आलोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा चांगला मोबदला आम्ही देतो. मात्र ऐन सीझनमध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे खरेदी-विक्री थांबली आहे.
- खुशील सहाणे,
काजू बी व्यापारी, जव्हार