तांत्रिक अडचणीत कोरोनाचा अहवाल अडकला; रुग्णालयात मृतदेह सहा दिवसापासून पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:54 PM2020-07-01T15:54:06+5:302020-07-01T15:54:21+5:30
दरम्यान विरार पश्चिम ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- आशिष राणे
वसई : विरार स्थित एका अवघ्या 15 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल तांत्रिक अडचणीत सापडल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तब्बल सहा दिवसांहुन अधिक दिवस हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात ताटकळत उभे राहायची वेळ आली आहे.
दरम्यान विरार पश्चिम ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मागील सहा दिवसांपासून मृताचे कुटूंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडून आहे तर सहा दिवस उलटूनही मृतदेह मिळत नसल्याने मृतदेहासह त्याच्या कुटुंबियांची हेळसांड होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम स्थित ग्लोबल सिटी येथील एका भाजी विक्री करणाऱ्या राजा गुप्ता या 15 वर्षीय तरुणाला गावगुंडांनी पोटात लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या घटनेच्या दोन दिवसानंतर दि.25 जून रोजी या तरुणाचा मृत्यू झाला तसेच पुढील तपासासाठी विरार पोलिसांच्या विनंतीनुसार रुग्णालया मार्फत मृतदेहाची कोरोना चाचणी देखील करण्यात आली.
मात्र आज सहा दिवस उलटूनही मृताचा कोरोना अहवाल अद्यप आला नसल्याने संपूर्ण कुटुंबीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून आहेत. एकतर आधीच कोरोनामुळे ओढवलेल संकट व त्यात आपल्या घरातल्या मुलाचा झालेला अकस्मात मृत्यू यात आधीच पायाखालची जमीन सरकली असताना त्यात ही एक नवी समस्या डोकं वर करून गुप्ता कुटुंबियांसमोर उभी आहे.
परिणामी विरार ग्रामीण रुग्णालय कोरोना चाचणीत हलगर्जीपणा करीत असल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाचा भाऊ अजय गुप्ता यांनी केला आहे. रुग्णालयाच्या वतीने कोरोना चाचणीचे स्वॅप हे मुंबईत पाठवून देण्यात आले होते. मात्र तेथील रूग्णालयातील काही अडचणींमुळे हा अहवाल अद्यप आला नसल्याचे कारण रुग्णायाच्या वतीने देण्यात आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाला विचारले असता येत्या एक दिवसांत हा मृतदेह अहवाल आल्यानंतर हा मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.