एका शिक्षकामुळे आठ जणांना कोरोनाची बाधा; चार विद्यार्थी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 12:13 AM2020-07-04T00:13:14+5:302020-07-04T06:53:51+5:30
१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.
जव्हार : शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथील एका शिक्षकाने काही दिवसांपूर्वी शाळेत जाऊन १०६ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले होते. तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून चार विद्यार्थी, तीन कर्मचारी व एक पालक अशा आठ जणांचे अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली.
लागण झालेला शिक्षक एका प्रतिबंधित इमारतीत राहत होता. पूर्वी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्याला गावाकडे जायचे म्हणून तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान हा शिक्षक त्यांच्या संपर्कात आला. असा संपर्कातून संपर्क होत गेला आणि न कळता शाळेत पुस्तके वाटप करण्यात आले होते. ग्रामीण अदिवासी भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यात आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. ही गंभीर बाब असून यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.
१४ ते १५ वयोगटांतील हे सर्व विद्यार्थी आहेत. तसेच शाळेतील तीन कर्मचारी व एक पालक अशा एकूण आठ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.