coronavirus: वसई-विरारमध्ये १० बाधितांचा मृत्यू, दिवसभरात ३२२ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:52 AM2020-07-11T01:52:13+5:302020-07-11T01:52:20+5:30
वसई-विरारमध्ये दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.
वसई : वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये शुक्रवारी दिवसभरात ३२२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आता एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३४४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी दहा रुग्णांनी या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमावले आहेत. यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १५० झाली आहे. तर दिवसभरात ३२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता एकूण बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३४४ झाली आहे. मात्र त्याच वेळी दिवसभरात ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४९३१ झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण उपचार घेणाऱ्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
बोईसरमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
बोईसर : येथील भीमनगर वसाहतीतील एका व्यक्तीला सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्याच कुटुंबातील अन्य १६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून भीमनगरची वसाहत शुक्रवारी सील करण्यात आली.
दांडी पी.एच.सी. क्षेत्रातील बोईसर परिसरात आतापर्यंत ९० रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दलाल टॉवरमध्ये बोईसरमधील पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत सुमारे ७५ दिवसात ९० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत सुमारे साठ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
उर्वरित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एकाच दिवशी १६ नवे रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचना व निर्देशांचे योग्य पद्धतीने आणि काटेकोर पालन होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असून हीच परिस्थिती कायम राहिली तर बोईसर हॉट स्पॉट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.