Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:53 AM2020-05-08T03:53:15+5:302020-05-08T03:53:28+5:30
सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.
पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध तुरुंगांत असलेल्या कैद्यांना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आले असून एकूण ११ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथे दिली.
पालघर येथील गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या घटनेच्या आढावाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यातील अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्यातील विविध तुरुंगांपैकी आठ तुरुंगांमध्ये लॉकडाऊन काळात विशेष व्यवस्था केली आहे. या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. तसेच सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या अन्य ५ हजार ५०० अशा एकूण ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगांतील अकरा हजार कैद्यांची संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले. मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या एका स्वयंपाकीला लागण झाली. त्याच्या संसर्गाने ७२ कैद्यांना लागण झाल्याचा अहवाल आल्याने राज्यातील आठ तुरुंगांत कुणालाही भेटण्यासाठी आत सोडले जात नाही, तसेच कुठल्याही कैद्याला तुरुंगाच्या बाहेर सोडले जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात साडेतीन कोटींचा दंड वसूल
राज्यात २ लाख २४ हजार २२९ रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले असून ४४९ क्वारंटाइन रुग्ण पळून गेले आहेत. त्यांच्यावर आणि भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केलेल्या अन्य ९६ हजार २३१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या ५३ हजार ३३० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहितीही त्यांनी दिली.