Coronavirus: नालासोपाऱ्यातील अवघ्या १७ दिवसांच्या चिमुकलीची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:56 AM2020-05-08T03:56:53+5:302020-05-08T03:57:04+5:30
वसई-विरारमध्ये आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण
नालासोपारा/वसई : नालासोपारा शहरात १७ दिवसांच्या चिमुकलीने कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था परिसरातील रिद्धी विनायक मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका आठ दिवसांच्या कोरोनाबाधित नवजात बालिकेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या बालिकेचे वडील कोरोनाबाधित असल्याने त्यांच्याकडूनच या बालिकेला संसर्ग झाला होता. या बालिकेवर सलग १७ दिवस उपचार करून इथल्या डॉक्टरांनी तिला कोरोनामुक्त केले आहे. या बालिकेला रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले.
दरम्यान, वसई-विरारमध्ये गुरुवारी आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये एका कॅन्सरग्रस्त तरुणाचा आणि एका गरोदर महिलेचा समावेश आहे. तर, गुरुवारी विरार आगाशी-१, नालासोपारा पूर्व पश्चिम-२ आणि विरार पूर्व -१ असे एकूण पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता मुक्त रुग्णांची संख्या ९५ वर गेली आहे . तर ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.