CoronaVirus: धक्कादायक! सील केलेल्या रुग्णालयातून 24 संभाव्य कोरोना रुग्ण पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:51 AM2020-04-20T00:51:26+5:302020-04-20T07:12:11+5:30
पळून गेलेल्यांमध्ये रुग्णालयातील 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश
कासा : डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने रुग्णालय तत्काळ सील केले, मात्र या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड आहे.
खबरदारी उपाय म्हणून त्या डॉक्टरांच्या सहवासात आलेल्या अन्य डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी तसेच उपचारासाठी दाखल रुग्ण यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक अशा एकूण १८७ जणांना उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी ‘क्वारंटाइन’ करण्यात आले होते. यामध्ये रुग्णालयातील रुग्ण ५७ (यामध्ये २२ नवजात बालकांचा समावेश), रुग्णांचे ७२ नातेवाईक तसेच ५८ रुग्णालय कर्मचारी यांचा समावेश होता. १६ आणि १७ एप्रिलला या सर्वांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. १८७ संशयितांपैकी ९ कंत्राटी कर्मचारी, १० रुग्णांचे नातेवाईक व ५ रुग्ण असे एकूण २४ कोरोना संशयित पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने कासा पोलिसांना दिली होती. हे सर्व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याचे समजते.
पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र मेहनत घेत असताना अशा प्रकारे संशयितांचे पळून जाणे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. उपजिल्हा रुग्णालयातून २४ कोरोना संशयित पळून गेल्यामुळे कासा परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हे रुग्णालय सील करण्यात आलेले असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
३७ अतिजोखमींचे अहवाल निगेटिव्ह
पालघर तालुक्यात १० तर डहाणू तालुक्यात ७ रुग्ण कोरोनाबाधित आढळलेले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, पालघर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३७ अतिजोखमीच्या सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १३ जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. तसेच डहाणू तालुक्यातील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.