CoronaVirus: वसई-विरारमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण; बाधितांचा आकडा 104 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:58 PM2020-04-24T23:58:34+5:302020-04-24T23:59:37+5:30
वसईतील डॉक्टर महिला व नालासोपारातील दोन रुग्णालय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !
- आशिष राणे
वसई -विरार शहरात शुक्रवारी 3 नव्या कोरोना रूग्णाची नोंद झाली असून यात एक 45 वर्षीय डॉक्टर महिला रुग्ण व 2 रुग्णालय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच वसई तामतलाव येथील एका 75 वर्षाच्या वृद्धाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेने दिली.
विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा वसई पश्चिम भागातील एक 45 वर्षीय डॉक्टर महिला पॉझिटिव्ह आढळून आली असून तिच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तर मुंबईत खाजगी रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करणारे नालासोपारा पूर्वेतील 58 व 55 वर्षीय दोघे पुरुष रूग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर देखील मुंबईत उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी वसई-विरारमधील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली. आतापर्यंत 104 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 32 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 7 इतकी आहे. तत्पूर्वी गुरुवारी संध्याकाळी उशिरा अर्नाळा येथील 66 वर्षीय वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूची नोंद पालघर ग्रामीण जिल्हयात घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तालुक्यातील हा कोरोनाचा 8 वा बळी आहे. शुक्रवारी पालिकेने अजून 7 जण कोरोना मुक्त झाल्याची माहिती दिली.
वसई तामतलाव येथील 75 वर्षीय जेष्ठ कोरोना रुग्णाचा मृत्यू
गुरुवारी अर्नाळा स्थित 66 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर शुक्रवारी वसईच्या तामतलाव स्थित 75 वर्षीय जेष्ठ रुग्ण हा नालासोपाऱ्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यावेळी त्यांची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मागील दोन दिवसात त्यांची प्रकृती ढासळत होती. अखेर शुक्रवारी नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील रुग्णालयात त्यांचा कोरोनामुळे मृत्य झाल्याचे पालिकेने घोषित केले. दोन दिवसात दोन मृत्यू झाल्याने वसई तालुक्यात पालिकेची चिंता नक्कीच वाढली आहे.
दि.24 एप्रिल 2020 शुक्रवारची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
वसई -1 महिला, नालासोपारा - 2 पुरुष
एकूण रुग्ण संख्या - 3
मयत -वसई -1
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -104
कोरोना मुक्त संख्या :- 32
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 7
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 65