Coronavirus: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:02 PM2021-05-07T16:02:10+5:302021-05-07T16:03:15+5:30
Vasai-Virar News : आयुक्त गंगाथरन डी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रजेवर गेल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.
विरार : वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा सतीश लोखंडे यांची वर्णी लागणार, या समाज माध्यमांमधील बातम्यांनी शुक्रवारी सकाळपासून वातावरण ढवळून निघाले. आयुक्त गंगाथरन डी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रजेवर गेल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.
वसई-विरार महापालिकेचे विद्यमान आयुक्त गंगाथरन डी. यांची नियुक्ती २५ मार्च २०२० रोजी झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा कार्यकाल वादग्रस्त राहिला आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासोबत नसलेला समन्वय व नियुक्ती काळात घेतलेले वादग्रस्त निर्णय, शिवसेना नेत्यांना आयुक्त देत असलेले झुकते माप यामुळे आयुक्त गंगाथरन डी. यांच्याविरोधात सुरुवातीपासूनच वातावरण होते. दरम्यान; कोविड-१९ काळात महापालिकेच्या नियोजनाचे परिणाम म्हणून वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोविड-१९चे संक्रमण वाढल्याचे आरोपही आयुक्त गंगाथरन डी. यांच्यावर विरोधी पक्षाकडून करण्यात आले आहेत. अशा स्थितीत वसई-विरार महापालिका आयुक्तपदी सतीश लोखंडे यांची पुन्हा नियुक्ती होणार, या बातमीला महत्त्व असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते.
सतीश लोखंडे यांनी २०१६ पासून वसई-विरार महापालिकेचा कार्यभार सांभाळलेला आहे. साडेतीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सतीश लोखंडे यांची नियुक्ती राज्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सीईओपदी झाली होती. तर त्यांच्या जागी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून बी.जी. पवार आले होते. वसई-विरार महापालिका आयुक्तपदी असताना सतीश लोखंडे यांनी अनेक विकासकामांना मूर्त रूप दिले होते. विशेष म्हणजे नागरिकांसोबत संवाद साधता यावा, याकरता बुधवार-गुरुवार हे दोन वार जनतेकरता राखून ठेवले होते. सतीश लोखंडे यांचा पूर्वानुभव आणि जनता व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत असलेला समन्वय व संवाद लक्षात घेता ते या संकटकाळी न्याय देऊ शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.