coronavirus: वसईतील संतप्त फेरीवाल्यांची अधिकारी-पोलिसांवर दादागिरी, महापालिकेच्या कारवाईत अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:14 AM2020-07-10T01:14:16+5:302020-07-10T01:14:52+5:30
कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी वसईतील अंबाडी, माणिकपूर आणि दीनदयाळनगर येथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.
नालासोपारा : लॉकडाऊनचे नियम मोडून दाटीवाटीने बसलेल्या फेरीवाल्यांनी रस्त्यावर हंगामा करून पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनाच दादागिरी करीत रस्त्यावर भाज्या फेकून देण्याची घटना वसईत गुरुवारी घडली आहे.
कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी वसईतील अंबाडी, माणिकपूर आणि दीनदयाळनगर येथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानुसार अंबाडी आणि माणिकपूर येथील फेरीवाल्यांनी बाजार बंद ठेवला होता, मात्र, दीनदयाळनगर येथील फेरीवाल्यांनी महापालिकेचा आणि शासनाचा नियम धुडकावून गुरुवारी बाजार भरवला होता. या बाजारात बसलेल्या अनेक विक्रेत्यांनी मास्क लावले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियमही त्यांनी पायदळी तुडवला होता. तशी माहिती मिळाल्यावर नवघर माणिकपूर विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांनी कारवाईसाठी एक पथक पाठवले होते. या पथकासोबत पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.
महापालिकेच्या पथकाने या फेरीवाल्यांना बाजार बंद करण्यासच्या सूचना दिल्यावरही त्यांनी आपला व्यवहार सुरूच ठेवला. त्यामुळे पालिकेच्या पथकाने त्यांचा माल जप्त करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईत अडथळा निर्माण करून फेरीवाल्यांनी स्वत:च भाज्या रस्त्यावर फेकून ‘रास्ता रोको’ केला. तसेच त्यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनाही अरेरावी करून दादागिरी केली. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले होते. या प्रकरणी गिल्सन गोन्साल्वीस यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.