coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:15 PM2020-04-08T18:15:40+5:302020-04-08T18:17:20+5:30
आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
पालघर/बोर्डी:- ना वेळेवर जेवण, ना आरोग्याची तपासणी, ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क फक्त आपापल्या ट्रॉलर्समध्ये ठेवलेल्या फर्स्ट एडच्या डब्यातील औषधांवर जिल्ह्यातील हजारो खलाशी कामगार कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराशी वेरावल येथे सामना करीत आहेत. आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
पालघर जिल्ह्यातून पोरबंदर, वेरावल येथील मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर खलाशी कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमारे 1 हजार 800 कामगारांना 4 एप्रिल रोजी झाई-बोर्डीजवळील नारगोल बंदरात उतरविण्यात आले होते. यापैकी 1122 कामगारांना गुजरात सरकारने तर अन्य 100 ते 150 कामगारांना दमण-सिल्वासा प्रशासनाने स्वीकारले होते.
उर्वरित पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी, चिखला, तलासरी आदी भागातील 700 कामगारांना महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनाला त्यांना स्वीकारण्याचे कुठलेही लेखी आदेश न दिल्याने त्या कामगारांना गुजरात पोलिसांनी जबरदस्तीने पुन्हा पोरबंदर, वेरावलच्या दिशेने पळवून लावले, या कामगारांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे ह्यांच्याकडे आम्हाला जिल्ह्यात प्रवेश द्या, अशी मोबाईलवरून मनधरणी केल्यानंतर ही राज्यशासन, पालकमंत्र्यांकडून कुठलेही आदेश न मिळाल्याने जिल्हाधिकारी हतबल ठरले होते. गुजरात सरकार, चेन्नईचे सरकार आपल्या राज्यातील कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असताना आमचे मायबाप महाराष्ट्र सरकार मात्र आमच्याकडे ढुंकूनही बघत नसल्याची नकारात्मक, उद्रेकाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.