Coronavirus: मार्केट उघडताच नागरिकांची गर्दी; जव्हार, वाड्यात खरेदीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:43 AM2020-05-09T02:43:08+5:302020-05-09T02:43:17+5:30

जव्हारवासीयांची बेपर्वाई : वारंवार सूचना देऊनही उपयोग होईना

Coronavirus: Crowds of citizens as soon as the market opens; Jawahar, rush to shop at the castle | Coronavirus: मार्केट उघडताच नागरिकांची गर्दी; जव्हार, वाड्यात खरेदीसाठी झुंबड

Coronavirus: मार्केट उघडताच नागरिकांची गर्दी; जव्हार, वाड्यात खरेदीसाठी झुंबड

Next

जव्हार/वाडा : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १८९ वर गेला आहे, तर पालघर, डहाणू आणि वाडा या तालुक्यांमध्ये २७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरीही नागरिकांत संसर्गाच्या बाबतीत बेपर्वाई दिसत असून मार्केट उघडताच लोकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. अशावेळी ‘सोशल डिस्टन्सिंग’चाही सर्वत्र फज्जा उडत आहे.

जव्हार तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. प्रशासन कोरोनाबाधा टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, मात्र नागरिकांना त्याचे भान नाही. जेव्हा जेव्हा बाजारपेठा सुरू होतात, तेव्हा नागरिक बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत असल्याने नागरिक कोरोनाला आमंत्रण देत आहेत का, असा सवाल केला जात असून लोकांच्या या बपर्वा वृत्तीविषयी चिंता व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालघर जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केल्यानंतर ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या विशेष सवलतींसाठी सूट देण्याचे आदेश पारित केले आहेत. संबंधित नगर परिषदेला आपापल्या क्षेत्रात तशी सूट देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार जव्हारच्या व्यापारीवर्गाच्या विनंतीवरून सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, अजूनही नागरिकांच्या वागण्यात काहीही फरक होताना दिसत नसून बाजारपेठ सुरू झाल्यानंतर पुन्हा तुफान गर्दी बघावयास मिळाली.
तब्बल दीड महिन्यांनंतर बाजारपेठ सुरू झाल्याने सकाळपासून शहरात विविध सामान खरेदीसाठी ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. यामुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अखेर नगर परिषदेने दोन वाहने घेऊन नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याबाबत सूचित केले. बँकांमध्ये देखील अशीच गर्दी दिसत होती.

दुचाकी, बँकग्राहक आणि शहरात समान खरेदीसाठी गर्दी यामुळे नगर परिषदेला सकाळपासून गर्दी पांगवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. दुपारपर्यंत गर्दी कमी झाली, मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसले. पोलीस ठाण्याच्या बाजूला तसेच समोर दोन मोठ्या बँका तर दोन पतसंस्था आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकांची गर्दी थेट पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बाजूला लागून असलेल्या बोळापासून सोनार आळीपर्यंत होती. मात्र येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बरेच दिवस बंद असलेली बाजारपेठ आज उघडल्याने सुरुवातीला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु नगरपंचायत प्रशासनाने व्यापारी असोसिएशनला सूचना दिल्यानंतर नियमांचे पालन करूनच नागरिक खरेदी करत होते. - सागर साळुंखे, मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत

वाड्यातील मार्केट पाच दिवसांनी उघडले
वाडा : कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने वाडा शहरातील तीन किमीचा परिसर सील करून बाजारपेठ कडकडीत बंद केली होती. शुक्रवार, ८ मे सकाळपासून बाजारपेठ खुली झाल्यावर खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे धाब्यावर बसवल्याचे चित्र वाडा शहरात पाहावयास मिळाले. वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत गडचिंचले हत्या प्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. यामुळे त्याच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पाच दिवस कडकडीत बंद असलेल्या वाडा शहरातील सलून, जिम, यासारखी एकत्रित जमण्याची ठिकाणे वगळून शहरातील सर्व दुकाने सुरू केली. मात्र नागरिकांनी सर्वच नियम पायदळी तुडवत खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली.

Web Title: Coronavirus: Crowds of citizens as soon as the market opens; Jawahar, rush to shop at the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.