Coronavirus : ‘कोरोना’ नाही डेंग्यू-मलेरियाने आजारी पडू, वसई-विरारकरांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:31 AM2020-03-17T00:31:52+5:302020-03-17T00:32:02+5:30
सद्यस्थितीत सर्वांच्याच तोंडावर कोरोनाचे नाव असले तरी वसई-विरारमध्ये मात्र डासांचा त्रास वाढतो आहे.
विरार : वसई-विरारमध्ये एकीकडे ‘कोरोना’ विषाणूपासून बचावासाठी मास्क व सॅनिटायझर्सने हात धुवून दक्षता घेतली जात असताना दुसरीकडे मात्र डेंग्यू-मलेरिया हा आजार नाक वर काढू लागला आहे. त्यामुळे जसा देशभरात कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आणि लागण झालेल्यांचा आकडा वाढत आहे, तसा वसईत डेंग्यू-मलेरियाचा आजार झालेल्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. यामागे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नियमित औषध फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सद्यस्थितीत सर्वांच्याच तोंडावर कोरोनाचे नाव असले तरी वसई-विरारमध्ये मात्र डासांचा त्रास वाढतो आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिक डेंग्यू-मलेरियासारख्या आजाराने त्रस्त होत आहेत. नागरिक या डासांमुळे हैराण झाले आहेत.
मध्यंतरी डेंग्यू-मलेरियाने मृत्यू पावलेल्या व लागण झालेल्या नागरिकांचा आकडा वाढला होता. त्यानुसार महापालिकेकडून नियमित धूर फवारणी व कीटकनाशक फवारणी केली जात होती. मात्र आता नियमित औषध फवारणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील गल्ली, कॉलनीत डासांचे प्रमाण अचानक वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांना डेंग्यू-मलेरियासदृश्य आजाराला सामोरे जावे लागते आहे. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक प्रभागात फवारणी होत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात पालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासीन असल्याचा नागरिकांनी आरोप आहे.
पालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यू-मलेरियासारखा आजार नियंत्रणात आणू शकत नाही, तर ते कोरोनासारख्या आजाराशी कसा लढा देणार, असा नागरिकांचा सवाल आहे. पालिकेने आता शौचालय, मार्केट आवारात उभ्या गाड्या, साचलेले पाणी, कचरा यावर धूर फवारणी करण्याची नागरिकांची मागणी आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नियमित औषध फवारणी सुरू आहे. १०५ पोटिंग मशीन, १९४ स्प्रे पंप, ४०० कर्मचारी त्यावर कार्यरत असून वॉर्डप्रमाणे प्रत्येक आठ दिवसांनी फवारणी सुरू आहे. तसेच कोरोना विषाणूच्या दृष्टीने सुद्धा नायगाव, वसई, नालासोपारा व विरार या चार स्टेशन परिसरात स्प्रे मारले जात आहेत.
- वसंत मुकणे, आरोग्य अधिकारी, वसई-विरार महापालिका