Coronavirus: वसईव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्र ‘रेड झोन’मधून वगळा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:14 AM2020-05-07T06:14:41+5:302020-05-07T06:14:54+5:30
खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे
वसई/जव्हार : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू असे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यांत रुग्णसंख्या शून्य आहे. मात्र संपूर्ण जिल्हा ‘रेड झोन’ घोषित केला आहे. यामुळे जास्त रुग्णसंख्या असलेला वसई तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र ‘रेड झोन’मधून वगळण्याची मागणी पालघरचे खा. राजेंद्र गावित आणि विक्रमगडचे आ. सुनील भुसारा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. तर वसई, पालघर आणि डहाणू असे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यात रुग्णसंख्या शून्य आहे. संपूर्ण जिल्हा ‘रेड झोन’ घोषित केल्याने येथील अनेक उद्योगधंद्यांवर याचा मोठा परिणाम होईल तसेच लोकांना रोजगारही मिळणार नाही. त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने पालघर जिल्ह्यातील एकमेव वसई-विरार शहर महापालिकेचे क्षेत्र वगळता इतर भाग हा ‘आॅरेंज झोन’मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, विक्रमगड विधानसभेचे आ. सुनील भुसारा यांनीही सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशीच मागणी केली आहे. संपूर्ण पालघर जिल्हा रेड झोन घोषित केल्याने अनेक उद्योगधंदे व कारखाने यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वसई व वसई - विरार महानगरपालिका व इतर तालुके असे दोन स्वतंत्र वेगवेगळे विभाग करावेत, जेणेकरून उर्वरित तालुक्यातील अनेक उद्योगधंदे व कारखाने सुरू करणे शक्य होईल. याबाबत उचित कार्यवाही करण्याची मागणी भुसारा यांनी केली आहे.