Coronavirus : पालघर जिल्ह्यातील यात्रा-मंदिरे ३१ मार्चपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:43 AM2020-03-17T00:43:17+5:302020-03-17T00:43:43+5:30

परदेशांतून आलेल्या प्रवाशांमुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Coronavirus : Fair-Mandirs in Palghar district closed till March 31 | Coronavirus : पालघर जिल्ह्यातील यात्रा-मंदिरे ३१ मार्चपर्यंत बंद

Coronavirus : पालघर जिल्ह्यातील यात्रा-मंदिरे ३१ मार्चपर्यंत बंद

Next

पालघर/डहाणू  -  डहाणूची महालक्ष्मी माता, केळव्याची शितलाई माता आणि सातपाटी येथील श्रीराम नवमी यात्रांसह जिल्ह्यातील सर्व यात्रांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. १६ ते ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश लागू केला आहे. दरम्यान, २ एप्रिलपासून सातपाटी येथे तीन दिवस भरणारी प्रसिद्ध श्रीराम नवमी यात्रा तसेच ८ एप्रिलपासून १५ ते २० दिवस चालणारी महालक्ष्मी मातेची यात्रा, केळवे येथील शितलाई माता, वडराई येथील कालिका माता यात्रा, हनुमान जयंती यात्रा आदी यात्रांवर कोरोनाचे सावट आहे. दरम्यान, बंदी आदेशामुळे भविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

परदेशांतून आलेल्या प्रवाशांमुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक प्रवासी परदेशांतून आलेले आहेत. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, मात्र त्यातील कुणीही ‘कोरोना’बाधित असल्याचे अद्यापपर्यंत आढळलेले नाही. असे असले तरीही ‘कोरोना’चा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी
डॉ. कैलाश शिंदे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाºयांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर संस्थान, जीवदानी माता संस्थान, शितलादेवी, केळवा येथील इको व्हिलेज इस्कॉन, गालतरे शनी मंदिर, सदानंद बाबा आश्रम तुंगारेश्वर व जिल्ह्यातील इतर सर्व धार्मिक स्थळे (देवस्थानच्या पुजाराकडून केली जाणारी वैयक्तिक पूजाअर्चा वगळून) आदी ठिकाणी १६ ते ३१ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, डहाणू तालुक्यातील यात्रा ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकारी गोविंद ओमासे व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी बैठक संपन्न झाली.

शाळांमध्ये शुकशुकाट, बाजारातली गर्दी घटली
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी लागू केला आहे. त्यानुसार डहाणू नगर परिषद क्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाºयांनी १६ ते ३१ मार्चदरम्यान मनाई आदेश लागू केला आहे. सोमवारी शहरातील आठवडे बाजार भरला होता. मात्र गर्दी खूपच कमी होती. येथे मुंबई आणि गुजरात येथील शहरातून छोटे-मोठे विक्रेते येत असून त्यांना आर्थिक फटका बसला. शहरातील वीस अंगणवाड्या, आठ शाळा, तीन महाविद्यालये आणि बारा जिल्हा परिषदेच्या शाळा ३१ मार्चपर्यंत बंद असणार असल्याने शाळा परिसरात शुकशुकाट होता तर स्कूल बस बंद असल्याने वाहतूक रोडावली होती. दरम्यान, तालुक्यातील बोर्डी येथील आचार्य भिसे विद्यानगरीत केजी टू पीजी विविध माध्यमातील सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालय आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी गुजरातच्या वापी, बलसाड या शहरातून येतात. त्यामुळे तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना सुट्टीचा लाभ द्यावा, अशी पालकांची मागणी आहे. दरम्यान, प्रशासनाकडून राबविल्या जाणाºया जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन मिळत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काढलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. अंगणवाडीतील बालके, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे. जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
- विजयकुमार द्वासे, मुख्याधिकारी,
डहाणू नगर परिषद

सफाळे येथील गुढीपाडवा शोभायात्रा रद्द
सफाळे : सफाळे येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त होणारी शोभायात्रा या वर्षी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्या आवाहनाची दखल घेत सफाळे येथील अंतरंग सांस्कृतिक कलादर्पण प्रतिष्ठानने गुढीपाडव्यानिमित्त निघणारी शोभायात्रा रद्द केली आहे. तसेच कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी स्वच्छता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

वाड्यात मास्कचे मोफत वाटप
वाडा : जनरल कामगार युनियन वाडा शाखेच्या वतीने सोमवारी कुडूस येथे नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या देशभरात कोरोना व्हायरसची मोठी दहशत आहे. नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. याची गंभीर दखल शासनस्तरावर घेतली जात आहे. याचाच विचार करून वाड्यात मास्कचे मोफत वाटप करत असल्याचे अध्यक्ष रमेश भोईर यांनी सांगितले. या मोफत मास्कवाटपाचा लाभ स्थानिकांना झाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी युनियनचे सरचिटणीस सुरेश भोईर, रश्मी भोईर, दिलीप भानुशाली, पप्पू जाधव आदी उपस्थित होते.

जूचंद्रमधील फेस्टिव्हल बंद करण्याची मागणी
पारोळ : सध्या जगभर कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. या संसर्गजन्य रोगाचे हजारो बळी गेले असताना भारतातही या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक परदेशी व स्वदेशी नागरिक देखरेखीखाली असून शासनाने जमावबंदीचे आदेश पारित केले आहेत. शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. असे असतानाही जूचंद्रमध्ये ७ ते २५ मार्चदरम्यान सुरू असलेला फेस्टिव्हल बंद करण्याची मागणी भाजपने केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढत चालला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशभरात सुमारे ११७ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. तर एकट्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळल्याने महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच जमावबंदी आदेश पारित केले आहेत. एकाच ठिकाणी गर्दी करणे टाळा, रिसॉर्ट, हॉटेल, धाबे, शॉपिंग मॉल आदी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहेत. पालघर जिल्ह्यातही सदर आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. नागरिक जमा होतील, अशी ठिकाणे बंद करण्याचे आदेश आहेत. नायगाव परिसरातील जूचंद्र गावाच्या हद्दीत महालक्ष्मी नगर येथील मैदानात सध्या फेस्टिव्हल सुरू आहे. या ठिकाणी संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत मोठी गर्दी होते. कोरोनाचे सावट राज्यभर सुरू असताना येथे मात्र आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलीस व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. हे फेस्टिवल त्वरित बंद करण्याची मागणी भाजपचे जिल्हा सचिव प्रवीण गावडे यांनी केली आहे.


ग्रामीण भागातील शाळा बंद
मनोर : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून पालघर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण केंद्र सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या क्षेत्रांमधील सर्व महाविद्यालये, शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, तंत्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. वसई तालुक्यातील
मनोर परिसरातील जंगलपट्टी भागातील शाळा बंद करून विद्यार्थी, त्यांचे पालक, नातेवाईक तसेच गावकऱ्यांना कोरोना व्हायरसबद्दल काळजी घेण्याची तसेच उपाययोजनांच्या दृष्टीने जास्तीत जास्त जनजागृती करा, असे शिक्षकांनी सांगितले. तसेच कोरोनाबाबत चुकीची माहिती पसरवणाºयाला कठोर शिक्षा करणार असल्याचे जिल्हाधिकारी
डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, तसेच हात स्वच्छ धुणे आवश्यक असल्याची जगजागृती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात केली
जात आहे.

चिकन विक्रेत्यांचा धंदा बसला
मनोर : कोरोनाच्या भीतीने मनोर बाजारपेठ आणि इतर ठिकाणच्या चिकन विक्रेत्यांचे दुकानातील पिंजरे रिकामे आहेत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मनोर बाजारपेठेशी ६० ते ७० गावपाड्यांचा संपर्क येतो. रोजच्या जगण्यातील वस्तू घेण्यासाठी येथे हजारो लोकांची वर्दळ असते. कोरोना कोंबड्यांमुळे होतो, हा गैरसमज दूर करण्यात आला असला तरीही सध्या चिकन घेण्याबाबत लोकांमध्ये भीती पसरली आहे.

मनोर बाजारपेठेतील आणि ग्रामीण भागातील चिकन दुकानदारांवर झाला असून कोंबड्यांचे पिंजरे रिकामे दिसत आहेत. त्या धंद्यांवर अवलंबून असलेल्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गणेश घोलप हे विक्रेते म्हणाले की, मी वयाच्या १२ व्या वर्षापासून मटणविक्रीचे दुकान चालवतो. ३० वर्षांत कधी अशी वेळ आली नाही, मात्र, आता आम्हाला बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे, अशी माहिती एका विक्रेत्याने दिली.

आमदारांचे जनतेला आवाहन
नालासोपारा : सध्या देशात व राज्यात कोरोनाची साथ पसरली आहे. यावर खबरदारी म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी आवाहन केल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी तसेच शिंकताना व खोकताना रुमाल किंवा टिशू पेपरचा वापर करावा. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवून खाणे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सेनिटायझरचा वापर करावा हात साबणाने किमान २० सेकंद धुतले पाहिजे. नाक, तोंड, कान, डोळे यांना सारखा हात लावू नका. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये यांना आपल्या परिसरात जंतुनाशक फवारणी करावयाची असल्यास जंतुनाशकासाठी त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन वसईचे आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर यांनी केले आहे.

वातावरणातील विषाणू नष्ट होण्यासाठी यज्ञ

वसई : सध्या राज्यभरात कोरोनाचा कहर वाढता आहे. त्याबाबत योग्य ती औषधे अद्याप मिळालेली नसल्याने काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. हवेतून संसर्ग होत असल्याने त्यादृष्टीने उपाय म्हणून वातावरणातील विषाणू नष्ट व्हावेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी प्रयत्न केले जात आहेत.
वसई किल्ल्यातील प्रसिद्ध श्री नागेश महातीर्थ परिसरातील श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात
श्री धन्वंतरीचे पूजन आणि यज्ञ रविवारी आयोजित
केला होता. रुग्णांना औषधांचा गुण लवकरात लवकर यावा या हेतूने हा यज्ञ केल्याची माहिती धर्मसभेचे ऋषिकेश गुरुजी यांनी ‘लोकमत’ला दिली.
धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विविध औषधी द्रव्यांनी हा यज्ञ संपन्न झाला. तुर्वी कर्पे हिने धन्वंतरी स्तवन गायले तर वैद्य गोपाळ कर्पे यांनी संक्रमित आजारांपासून वाचण्यासाठी आणि ते पसरू नयेत यासाठी काय खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.

Web Title: Coronavirus : Fair-Mandirs in Palghar district closed till March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.